Sangli : कोल्हापूर रोडवरील अधिकृत खोक्यांच्या पुनर्वसनासाठी उपोषण
सांगलीत खोकीधारकांचे बेमुदत उपोषण सुरू; पुनर्वसनाची मागणी
सांगली: कोल्हापूर रोडच्या रस्ता रुंदीकरणामध्ये महापालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहीम राबवून काढलेल्या अधिकृत खोक्यांचे पालिका प्रशासनाने पुनर्वसन करावे या मागणीसाठी खोकीधारक संघटनेच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पालिकेच्या नवीन इमारती समोर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.. आयुक्तांच्या दालनात कोल्हापूर रोड येथील अधिकृत खोकीधारकांच्या चर्चे दरम्यान उपस्थितीत नगरसेवक व शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, अध्यक्ष गणेश कोडते, प्रवीण कांबळे व इतर खोकीधारक बैठकीदरम्यान खोक्यांचे पुनवर्सन पक्क्या गाळ्यामध्ये करण्याचे आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे स्वतःहून खोकीधारकांनी प्रशासनाला सहकार्य करून सर्व खोकी काढून घेतली आहेत. खोकी धारकांची खोकी काढल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात व्यवसाय बंद पडलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खोकीधारक हा गोरगरिब असून सर्व कुटूंब अवलंबून होते. व्यवसाय बंद पडल्यामुळे खोकीधारकांची परिस्थिती ढासळली आहे.
आयुक्त सत्यम गांधी यांनी लवकर गाळे बांधून देवून खोकीधारकांवरील संकट दूर करावे. तसेच कोल्हापूर रोड येथील आर.सी.सी. गटारीवर गाळे बांधून दयावेत महासभा ठराव अन्वये गाळे बांधण्यात येईल, असा ठराव केला होता.
त्यानुसार काही खोकीधारकांनी २२ जानेवारी २००८ रोजी प्रत्येकी ३७,५०० भरलेले आहेत तरी गाळे बांधून दयावे यासाठी खोकीधारक आणि संघटनेच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.