आगरवड्यात धोंडगणांची शेकडो वर्षांची परंपरा
प्रतिनिधी/ मोरजी
गोमंतकासह इतर राज्यात सर्वदूर असलेल्या लाखो भक्तांचे अढळ श्रद्धास्थान म्हणजे आई देवी लईराई. या देवीच्या जत्रोत्सवापूर्वी ‘धोंडगण’ गावागावात सोवळव्रत पाळून जत्रोत्सवाने व्रताची सांगता करतात. आगरवाडा येथील दमाजी वाड्यावर आजही ही शेकडो वर्षांची परंपरा अखंड पणे चालू आहे.
दामाजी वाड्यावरील या धोंड गणा मध्ये अगदी 15 वर्षे वयोगटा पासून 56 वर्षे वयोगटातील धोंडांचा समावेश आहे. यात दशरथ दमाजी, मनोज सांगाळे, संदीप दमाजी, तेजस सातार्डेकर, अनंत दमाजी, अजय दमाजी, अऊण सोमजी, तुळशीदास दमाजी, वसंत दमाजी, विश्वास मांद्रेकर, संतोष दमाजी, नीलेश पोखरे, शिवराम केरकर, शशिकांत पोखरे, सोनू आरोसकर, भालचंद्र मांद्रेकर, विवेक बांडेकर, प्रितेश दमाजी, अनिल मांद्रेकर आदीसह इतरांचा समावेश आहे. त्यात अनिल मांद्रेकर, भालचंद्र मांद्रेकर हे सर्वाधिक वयाचे धोंड आहेत. आपण वयाच्या 8 व्या वर्षांपासून अखंडित पणे हे व्रत करित आहे व आपल्या धोंड व्रताला आज 44 वर्षे पूर्ण होत असल्याचे अनिल केरकर यांनी सांगितले. आपल्या वडिलांच्या निधानानंतर ही परंपरा सांभाळीत आहे तर प्रतीक कलंगुटकर हा युवक सर्वात लहान वयाचा आहे.
जिल्हा पंचायतीने बांधले लाईराई सभागृह
सुरुवातीला हे धोंड माडाच्या झावळ्यांचा मंडप उभारून त्यात आपले धोंड व्रत करण्यासाठी त्या ठिकाणी थांबायचे. त्याच मंडपात जेवण शिजवायचे त्याच ठिकाणी झोपायचे. आज माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर व विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगांवकर यांनी जिल्हा पंचायत फंडातून याठिकाणी सभागृह बांधले आहे. आज आम्ही या लाईराई सभागृहामध्ये धोंड व्रत पाळतो.
व्रतात सोवळे व्रत कडकपण पाळले जाते.....
देवी लाईराईचे आम्ही धोंड आमवस्येपासून घरातून बाहेर पडतो ते जत्रा झाल्या नंतर घरात राहायला जातो तोपर्यत आमचे सर्व व्यवहार याचं ठिकाणी पार पडतात. चहा, जेवण, नाश्ता सर्व आम्हीच करित असतो त्यासाठी आळी पाळीने काम करतो आणि हे सर्व व्यवहार आम्हाला ओलेत्याने करावे लागतात. जेवण, चहा करण्रायाला आंघोळ करावी लागते इतरांना स्पर्श झाला तर विटाळ झाला समजून आंघोळ करावी लागते. जत्रेच्या आदल्या दिवशी आम्ही मंडपात येणाऱ्या सर्वांना जेवायला वाढतो अर्थातच हे सर्व जेवण शाकाहारी असते.
जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महापूजा जत्रा निर्विघ्न पार पडल्यानंतर सर्व धोंडगणांच्या वतीने याठिकाणी श्री सत्यनारायण महापूजा होते. यावर्षी 25 एप्रिल रोजी दुपारी ही महापूजा होणार आहे या ठिकाणी रात्री महाप्रसाद ही होतो लोकांची यावेळी मोठी गर्दी होते, अशी माहिती धोंड भालचंद्र दमाजी यांनी दिली.