शेंडा पार्क येथे गवताला लागलेल्या आगीत शेकडो झाडे भस्मसात
पाचगाव वार्ताहर
शेंडा पार्क येथे रविवारी दुपारी वाळलेल्या गवताला आग लागली या आगीत शेकडो झाडे जळून भस्मसात झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
शेंडा पार्क येथील माळावर लाखो रुपये खर्च करून सुमारे पाच वर्षांपूर्वी 40 हजार झाडे लावली आहेत. शासनाच्या निधी अभावी या झाडांची निगा राखणे, त्यांना पाणी घालणे बंद करण्यात आले. निधीच नसल्याने सबंधित विभागाने या झाडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
शेंडा पार्क येथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडाजवळ वृक्षारोपण केलेली अनेक झाडे चांगल्या पद्धतीने वाढली आहेत. मात्र रविवारी दुपारी या परिसरातील वाळलेल्या गवताला आग लागली.या आगीत शेकडो झाडे जळून भस्मसात झाली.
मागील वर्षी या परिसरात सात ते आठ वेळा वाळलेल्या गवताला आग लागली होती. याची कल्पना असूनही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी या परिसरातील वाळलेले गवत लिलावात खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने काढून घेण्याच्या सूचना देणे गरजेचे होते. वाळलेले गवत वेळेत काढून घेतले जात नसल्यामुळे दरवर्षी या परिसरातील गवताला आग लागते या आगीत शेकडो झाडे भस्मसात होतात.
संबंधित विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना योग्य सूचना देत नाहीत.अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो झाडे, लहान मोठे कीटक, पक्ष्यांची घरटी दरवर्षी आगीत भस्मसात होतात. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.