दाबोळी, मोपा विमानतळांवर अडकले शेकडो प्रवासी
इंडिगोची गोव्यातील 31 विमान उड्डाणे रद्द झाल्याने संताप
वास्को : दाबोळी विमानतळावर काल दुसऱ्या दिवशीही इंडिगो एअरलाईन्सचे शेकडो प्रवासी अडकून पडले. इंडिगोची गोव्यातील 31 विमान उड्डाणे काल दिवसभरात रद्द करण्यात आली. केवळ 7 विमानांनी उड्डाणे केली. विमानतळावर अडकून पडलेल्या हवाई प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचारी कमतरतेमुळे निर्माण झालेली समस्या सुटू न शकल्याने दाबोळी विमानतळावर काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही प्रवाशांची तारांबळ दिसून आली. काल दुपारी 12 वा. पासून रात्री 11 वा. पर्यंत दाबोळी विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्सची 38 हवाई उड्डाणे होणार होती. मात्र, केवळ 7 विमानांचे उड्डाण होऊ शकले. त्यामुळे देशातील विविध शहरांकडे उड्डाणासाठी थांबलेले शेकडो प्रवासी अडकून पडले आहेत. काहींना बऱ्याच विलंबाने उड्डाण करावे लागले. या प्रवाशांमध्ये आजारी प्रवाशांचाही समावेश आहे. या प्रवाशांनी हवाई सेवेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांची अडचण असती तर प्रवाशांचे बुकिंगच का केले असा सवालही या प्रवाशांनी व्यक्त केला.
खुद्द खासदार तानावडेंनाही फटका
खासदार तानावडे हे सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने दिल्लीत आहेत. मात्र त्यांना काल भाजपचे नेते सतिश धोंड यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी गोव्यात यायचे होते, मात्र इंडिगोचे विमान रद्द झाल्याने त्यांना दुसऱ्या विमानाचे तिकिट काढून विवाह सोहळ्यास उपस्थित रहावे लागले. त्यासाठी त्यांना 9 हजार रुपयांच्याऐवजी तब्बल 43 हजार रुपयांचे तिकिट काढून गोवा गाठावा लागला.