हंगेरीत पत्नींनी शेकडो पुरुषांची केली हत्या
जगात अनेकदा अशा घटना घडतात, ज्या हादरवून टाकणाऱ्या असतात. 95 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेने लोकांना हादरवून टाकले होते. सुमारे 50 महिलांवर एक खटला सुरू करण्यात आला होता. या महिलांनी युरोपीय देशातील एका गावात राहणाऱ्या बहुतांश पुरुषांना विष देत त्यांची हत्या केली होती. नाग्यरेव नावाच्या गावात अनेक महिलांनी 50 हून अधिक पुरुषांना विष देत मारून टाकले होते. हा भाग हंगेरीची राजधानी बुडापेस्टपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर आहे. 1911-29 दरम्यान या हत्या करण्यात आल्या. महिलांनी पुरुषांच्या जेवणात आर्सेनिक मिसळून ठार करण्यास सुरुवात केली होती. काही अहवालानुसार महिलांनी 100 हून अधिक तर काही अहवालांमध्ये 300 अधिक पुरुषांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
या सामूहिक हत्येतील मुख्य आरोपी महिला जोजसाना फाजकास होती. जोजसाना फाजकास याच गावातील आया होती. या गावात कुणीच स्थानिक डॉक्टर नव्हता, याचमुळे ती लोकांना औषधे द्यायची. जोजसानाशी गावातील महिला मोकळेपणाने बोलत होत्या, पती किंवा पुरुषांबद्दल काही समस्या असेल तर मी तोडगा सुचवू शकते असे जोजसाना सांगायची. दस्तऐवजांनुसार गावातील महिलांनी पुरुषांवर गैरवर्तन, बलात्कार आणि हिंसेच्या वेदनादायी कहाण्या सांगितल्या होत्या. यानंतर जोजसानाने महिलांना पतीच्या अन्नात विष मिसळून ठार करण्याचा उपाय सांगितला होता.
जोजसानाला रासायनिक औषधांबद्दल माहिती होती. गावात पाद्री नव्हता तसेच डॉक्टर नव्हता, म्हणून लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला होता. तिने गावात गर्भपात करण्यास सुरुवात केली, यामुळे त्यांच्यावर खटले चालले, परंतु कधीच शिक्षा झाली नाही. त्या काळात कमी वयात मुलींचा विवाह केला जायचा, तसेच घटस्फोट घेणेही अवघड होते, यामुळे महिलांनी हा मार्ग अवलंबिला होता. 1929 साली पोलिसांना याचा सुगावा लागल्यावर थडग्यांमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि तपासात त्यांना आर्सेनिक देऊन मारून टाकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जोजसानाने विषप्राशन करत आत्महत्या केली होती.