कारवारात शेकडो नागरिक उतरले रस्त्यावर
अय्यप्पा स्वामी भक्तांना सी-बर्ड नाविक दल प्रकल्पातील जवानांनी मारहाण केल्याचा निषेध
कारवार : अय्यप्पा स्वामी भक्तांना सी-बर्ड नाविक दल प्रकल्पातील जवानांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुदगा, तोडूर, अमदळ्ळी, चंडीया येथील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे मुदगा, तोडूर, चंडीया आणि अमदळ्ळी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सी-बर्ड प्रकल्पाच्या अमदळ्ळी गेट क्र. 1 समोर पोलीस बंदोबस्त केला आहे. गेटसमोर जिल्हा सशस्त्र दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
अप्पय्या स्वामी भक्तांवर हल्ला केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय गेट समोरून हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. गेटसमोर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुक्काम ठोकला आहे. कारवारचे तहसीलदार एन. एफ. नरोन्हा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. कारवार अंकोलाच्या माजी आमदार आणि भाजपच्या राज्य उपाध्यक्षा रुपाली नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काँग्रेसचे नेते शंभू शेट्टी आणि गणपती मांगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन अय्यप्पा स्वामी भक्तावर हल्ला केल्याच्या घटनेचा निषेध केला आणि भक्तांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने ताब्यात घेण्याची मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी संध्याकाळी अय्यप्पा स्वामी भक्त गुरू स्वामी श्रीनिवास कोडारकर (रा. मुदगा) यांच्या मोटारसायकली दरम्यान आणि नौदल सैनिकांच्या बुलेट वाहनादरम्यान जडीगद्दा येथे अपघात झाला होता. त्या अपघातात कोडारकर यांच्या पायाला दुखापत झाली होती. येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोडारकर आणि अन्य तीन भक्त मुदगाकडे निघाले असता नाविकदलातील 15 ते 20 कर्मचाऱ्यांनी (सैनिक) भक्तांना गाठले आणि मारहाण करून त्यानंतर फरार झाले.
चार तास रास्ता रोको
भक्तावर सैनिकांनी हल्ला चढविल्याची बातमी पसरताच वरील गावातील शेकडो नागरिक हमरस्ता क्रमांक 66 वर रविवारी रात्री दाखल झाले आणि मारहाणीच्या निषेधार्थ या रहदारीवरील वाहतूक सुमारे चार तास रोखून धरण्यात आली. रात्रीच्यावेळी रास्ता रोको करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. रास्ता रोकोमुळे कारवार आणि अंकोला दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रास्ता रोकोवेळी नाविक प्रकल्पाच्या विरोधात चोरदार घोषणा देण्यात आल्या आणि मारेकऱ्यांना तातडीने ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली.
सोमवारी पुन्हा जोरदार निदर्शने
रविवारी रात्रीच्या रास्ता रोकोनंतर घरी परतलेले स्थानिक सोमवारी सकाळी नेवल सिव्हिलीयन हाऊसिंग कॉलनी अमदळ्ळी गेट क्रमांक एक समोर मोठ्या संख्येने जमा झाले आणि प्रकल्प प्रदेशात प्रवेश करणाऱ्यांना अडवून ठेवले. त्यामुळे गेट समोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनास्थळी मोठा फौजफाटा जमा झाला. भक्तावर हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी ताठ भूमिका ग्रामस्थांनी घेतली व प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेटसमोर दाखल होण्याची मागणी केली. शेवटी नौदल अधिकाऱ्यांनी मारेकऱ्यांना तीन तासाच्या आत पोलिसांच्या ताब्यात देवू, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.