हम्बर्टचा अल्कारेझला धक्का
व्हेरेव्ह , सित्सिपसची आगेकूच
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सच्या युगो हम्बर्टने कारकिर्दीतील एक सर्वोत्तम खेळी करताना स्पेनच्या कार्लोस अल्कारेझचा धक्कादायक पराभव करून पॅरिस मास्टर्स एटीपी 1000 टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
हम्बर्टने अल्कारेझवर 6-1, 3-6, 7-5 अशी मात केली. फोरहँड फटक्यांची व बॅकहँड विजयी फटक्यांची बरसात करीत त्याने अल्कारेझवर 5-0 अशी झटपट आघाडी घेतली. अल्कारेझला नंतर संधी न देता हा सेट जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या मानांकित अल्कारेझने दुसऱ्या सेटमध्ये मात्र नियंत्रण मिळवित सेटही जिंकला. पण तिसऱ्या सेटमध्ये त्याने अनेक संधी वाया घालवल्या. एका गुणावर त्याने रिप्ले मागितल्यानंतर प्रेक्षकांनी त्याची हुर्योदेखील उडविली. पण त्याने विचलित न होता हम्बर्टशी 5-5 अशी बरोबरी केली. विजयाची चाहूल लागलेल्या हम्बर्टने एका अप्रतिम तिरकस व्हॉलीवर व नंतर जोरदार विजयी फटका मारत सेटसह सामना संपवला. त्याची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनशी होईल. आठव्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर डिमिट्रोव्हने आर्थर रिन्डर्कनेचचा 6-2, 4-6, 7-6 (7-5) असा पराभव केला. डिमिट्रोव्हने या सामन्यात 17 बिनतोड सर्व्हिस केल्या. डिमिट्रोव्हची पुढील लढत कॅरेन खचानोव्हशी होईल.
अन्य सामन्यात तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने फ्रान्सच्या आर्थर फिल्सचा 6-4, 3-6, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली. त्याने या सामन्यात 16 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याची लढत ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसशी होईल. सित्सिपसने फ्रान्सिस्को सेरुंडोलोचा 6-7 (1-7), 6-4, 6-2 असा पराभव केला. तिसऱ्या फेरीच्या अन्य सामन्यात अॅलेक्स डी मिनॉरने ब्रिटनच्या जॅक ड्रेपरवर 5-7, 6-2, 6-3, होल्गर रुनेने आर्थर कॅझॉवर 3-6, 6-3, 6-4, खचानोव्हने अॅलेक्सी पॉपीरिनवर 7-6 (7-5), 6-4, थॉम्पसनने अनुभवी अॅड्रियन मॅनारिनोवर 7-5, 7-6 (7-5) अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अव्वल मानांकित जेनिस सिनेर व सातवेळचा चॅम्पियन नोव्हॅक जोकोविचने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.