For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओवैंसीसोबत हात मिळविणार हुमायूं कबीर

06:22 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
ओवैंसीसोबत हात मिळविणार हुमायूं कबीर
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

तृणमूल काँग्रेसमधून निलंबित आमदार हुमायूं कबीर यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम सोबत आघाडी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कबीर यांनी शनिवारी मोठ्या बंदोबस्तात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथे अयोध्येतील बाबरी मशिदीच्या मॉडेलवर आधारित एका मशिदीच्या कामाचा शुभारंभ केला होता.

Advertisement

हुमायूं कबीर यांनी आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे. बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून राज्यात मुस्लिमांची संख्या जवळपास 35 टक्के असल्याचे मानले जाते. अशा सिथतीत ममता बॅनर्जी यांच्यासाठी हुमायूं कबीर यांचा हा निर्णय अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो. तर दुसरीकडे राज्यातील मुख्य विरोधी पक्ष भाजपने यापूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीचा पाया रचणारे हुमायूं कबीर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. तृणमूलमधून निलंबित आमदाराने आता ममतांना आणखी एक मोठे टेन्श देण्याची घोषणा करत राजकीय पारा वाढविला आहे. हुमायूं हे नवा पक्ष स्थापन करत ओवैसी यांच्यासोबत हात मिळविणार आहेत. बंगालमध्ये मुस्लिमांना सर्वसाधारणपणे तृणमूल काँग्रेसची मतपेढी मानले जाते. हुमायूं कबीर आणि ओवैसी यांची आघाडी ममता बॅनर्जींच्या या मतपेढीला सुरुंग लावू शकते. ओवैसी यांच्या पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांना स्वत:च्या बाजूने वळवू शकत असल्याचे यापूर्वीच दाखवून दिले आहे.

मी त्यांना का उत्तर देऊ?

हुमायूं कबीर यांनी शनिवारी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीच्या कामाचा शुभारंभ केला होता. शनिवारी अत्यंत मोठ्या संख्येत लोक पोहोचल्याने मी अत्यंत आनंदी आहे. आता मी स्वत:चा पक्ष घेऊन लोकांसमोर येणार आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळतेय. जगभरातून लोक माझे समर्थन करत आहेत. आघाडीकरता यापूर्वीच खासदार ओवैसी यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. आम्ही दोघे मिळून बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपविरोधात लढणार आहोत. ओवैसी मी एकत्र मिळून लढू हे आता निश्चित आहे, फिरहाद हकीम हे खरे मुस्लीम नाहीत. यामुळे मी त्यांना का उत्तर देऊ? मी सांप्रदायिक राजकारण करत असल्याचे म्हणणारे तो कोण असे प्रश्नार्थक विधान हुमायूं यांनी रविवारी केले. कोलकात्याचे महापौर आणि राज्याचे मंत्री फिरहाद हकीम यांनी यापूर्वी हुमायूं यांना लक्ष्य करत ते भाजपच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप केला होता.

भाजपकडून कबीर लक्ष्य

केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनी तृणमूलमधून निलंबित हुमायूं कबीर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बंगालमध्ये बाबरी मशीद कधीच स्वीकार केली जाऊ शकत नाही. हिंदू समुदाय योग्यवेळी याचे प्रत्युत्तर देईल. बंगालमध्ये कुणीच मशीद उभारणीला विरोध करत नाही, परंतु बाबरच्या नावावर मशीद उभारणे हिंदूंचा अपमान असून त्यांना चिथावण्याचा प्रयत्न वाटतोय असे मजूमदार यांनी म्हटले आहे.

कोट्स

मी काहीच बेकायदेशीर कृत्य करत नाही. कुणीही मंदिर, चर्च निर्माण करू शकतो आणि मी मशीद उभारणार आहे. बाबरी मशीद उभारली जाऊ शकत नाही असे बोलले जातेय., परंतु असे कुठेच लिहिलेले नाही. भारतीय राज्यघटनेनुसार कुणीही मशीद निर्माण करू शकतो, हा एक अधिकार आहे.

 हुमायूं कबीरममतांना इशारा

पिक्चर अभी बाकी असल्याचे म्हणत हुमायूं यांनी तृणमूल काँग्रेसची मुस्लीम मतपेढी संपुष्टात येईल असे वक्तव्य केले आहे. माझा पक्ष मुस्लिमांसाठी काम करेल. राज्यातील 135 जागांवर आमचा पक्ष उमेदवार उभे करणार आहे. बंगालच्या निवडणुकीत मी गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा हुमायूं यांनी केला.

Advertisement
Tags :

.