मानव आणि डास
सध्या जनुकीय क्षेत्रात प्रचंड संशोधन जगभर होत आहे. सजीवांच्या जनुकांमध्ये संपूर्ण सजीव सृष्टीचाच इतिहास, वर्तमान आणि भविष्य दडलेले आहे, असे मानले जाते. त्यामुळे या संशोधनावर मोठा भर दिला जात आहे. या संशोधनातून आजवर माहीत नसलेली आणि अतिआश्चर्यकारक अशी सत्ये उजेडात येत आहेत.

अशाच प्रकारचे एक आचंबित करणारे संशोधन अमेरिकेतील व्हर्जिनिया तंत्रवैज्ञानिक विज्ञापीठात करण्यात आले आहे. मानव आणि इतर सजीव यांच्यातील संबंधांचा उलगडा करणारे हे संशोधन आहे. पुरातन काळी मानवही अन्य प्राण्यांप्रमाणे वनांमध्ये वास्तव्य करीत होता. वनांमध्ये त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या सजीवांपासून धोका होता. कीटक आणि सूक्ष्म जीवांपासूनही धोका होता. मानव आणि त्याला धोका करणारे जीव यांच्याविषयीचे हे संशोधन आहे.
आपल्या घरांमध्येही अनेक प्रकारचे जीव राहतात. पाली, झुरळ, डास, मुंग्या आणि इतर प्रकारचे कीटक आपल्याला भंडावून सोडतात. त्यांचा कितीही नायनाट करण्याचा प्रयत्न केला, तरी ते पूर्णत: नष्ट कधीच होत नाहीत. मानव जेव्हा गुहांमध्ये रहात होता, तेव्हाही हे त्याचे तापदायक ‘मित्र’ त्याच्यासह होते आणि ते त्याला आत्तासारखाच त्रास देत होते, असे या संशोधनातून आढळून आले आहे. साधारणत: 13 सहस्र वर्षांपूर्वी मानवाने गुहेत राहणे सोडले. त्याने शेतीची कला आणि शास्त्र अवगत करुन घेतल आणि तो गुहांमधून बाहेर पडून वस्त्यांमध्या राहू लागला. त्यासरशी हे जीवही त्याच्यासह मानवी वस्त्यांमध्ये आले आणि मानवाला पूर्वीप्रमाणेच छळू लागले. मानव गुहेत रहात होता, तेव्हा त्याची संख्या कमी होती. तो शेती करु लागला आणि मोठ्या संख्येने एकत्र राहू लागला, तशी त्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली. त्याचवेळी मानवाच्या या मित्रांची संख्याही वाढू लागली. विशेषत: डास हा कीटक तर प्रारंभापासून मानवासोबत आहे. मानवाप्रमाणेच त्याची संख्याही वाढत आहे. लाखो वर्षांपासून तो मानवाच्या रक्तावर जगत आला आहे. मानववंशविस्तारासमवेतच डासाचा ‘वंशा’चाही विस्तार झाला आहे. डासांप्रमाणेच ढेकूणही मानवाबरोबरच गुहांमधून वस्त्यांमध्ये आलेले आहेत. त्यानंतर मानव जसा अधिकाधिक प्रगत झाला आणि त्याने आधुनिक घरे निर्माण करण्यास प्रारंभ केला, तसे डास आणि ढेकूणही त्याच्या घरी येऊन राहू लागले आहेत. या त्यांच्या ‘सहजीवना’चा उलगडा या संशोधनातून झाला आहे.