For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले है

06:13 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले है
Advertisement

हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले है

Advertisement

हमे तेरे तेरे तेरे चाहनेवाले है

म्हणत धूम धमाल उडवून देणाऱ्या नटाचं नाव आहे नईम सय्यद. गाण्याचा विषय आहे काळ्या माणसाच्या भावना. पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे की काय, पण आपल्याकडे काळ्या माणसांना उगीचच कमी लेखलं जातं. या गाण्यात अशाच माणसानं आपली बाजू मांडली आहे. तो आपल्या प्रेयसीला म्हणतो,

Advertisement

खयालों में खयालों में खयालों में है हंगामा

कहाँ भाग रही है तू काले से डर गई क्या?

साठच्या दशकातील ब्रह्मचारी चित्रपटातल्या या गाण्याला आवाज आहे रफी साहेबांचा आणि चक्क मेहमूदचाही. ज्यांच्यावर हे चित्रित झालंय ते आहेत ज्युनिअर महमूद म्हणून ओळखले जाणारे नईम सय्यद. यांना ज्युनिअर महमूद ही उपाधी खुद्द मेहमूद साहेबांनी दिली होती. एकूण या गाण्यात काळ्या रंगाची लोकांच्या मनात असलेली भीती, काळ्या माणसाचं गोरं नव्हे तर उज्ज्वल मन आणि त्याची प्रामाणिक भावना दाखवलीय. काळ्या माणसाकडे, काळ्या रंगाकडे जग तुच्छतेने बघतं. खरं तर ‘एक गोरी आणि हजार खोड्या चोरी’ असं म्हटलं जातं. पण गोऱ्या रंगाचा मोह आणि काळ्या रंगाचा तिटकारा काही सुटत नाही. वास्तविक कृष्ण म्हणजे काळा. आपल्या सर्वांचा आवडता कृष्ण चक्क काळा होता. इतका, की नरकासुर वधानंतर जेव्हा त्या बंदिवान स्त्रियांनी कृष्णाला पाहण्यासाठी बलरामांना विनंती केली तेव्हा त्यांनी मोठं गमतीदार उत्तर दिलं. ते म्हणाले माझा भाऊ इतका काळा आहे की अंधारात दिसणारही नाही. तेव्हा त्या स्त्रियांनी त्याला आपण पहावं आणि तो सर्वांना दिसावा म्हणून संपूर्ण नगर दिव्यांच्या आराशीने उजळून काढलं आणि कृष्णाचं दर्शन घेण्याची सोय केली. तोच दिवस नरकचतुर्दशीचा होय. ते दिवसही असे असतात की मराठी महिन्याचे शेवटचे दिवस. रात्रीचा घनदाट अंधार असतो. म्हणूनच तर दिव्यांची गंमत असते. पार्श्वभूमी अंधाराची असते म्हणून तर उजेड उठून दिसतो.

आपल्या चित्रपटसृष्टीत कितीतरी उत्तम अभिनेते आहेत ज्यांचा वर्ण काळा आहे. पण त्यांचा अभिनय इतका बावनकशी सोन्यासारखा आहे, की त्यांचा रंग, उंची वगैरेचा काही विषयच येत नाही. दीपक शिर्के यांच्यापासून ते आत्ताच्या प्रथमेश परब पर्यंत अशी ही मोठी यादी आहे. आणि सगळ्यांचा अभिनय कमाल आहे. तरीपण अजूनही इंडस्ट्रीतील गोऱ्या रंगाचं वेड काही गेलेलं नाही बरं... स्वभावाला औषध नाही हेच खरं.. किती आणि काय म्हणून सांगावी या काळ्या रंगाची कथा?

रात्र काळी घागर काळी

यमुनाजळे ही काळी हो माय

बुंथ काळी बिलवर काळी

गळा मोती एकावळी काळी वो माय

म्हणणारे विष्णुदास नामा म्हणजे संत नामदेव नव्हेत हं! हे विष्णुदास नामा वेगळे आहेत. त्यांनी अक्षरश: हजारोंच्या संख्येने काव्यरचना केली आहे. यांच्या ओव्या आणि स्फुट रचना अतिशय रसाळ आणि गोड आहेत. ही रचनाही अशीच फार सुंदर आहे. रात्रही काळी, ती घेऊन जातेय ती घागरही काळी, यमुनेचं पाणीही काळोखासारखं काळंशार आहे. ‘एकली पाण्याला नवजाय साजणी’ अशी ती जाताना अवगुंठन घेऊन जाते तेही काळंच. आणि तिच्या गळ्यातली मोत्याची एकावळी म्हणजेच एकेरी गुंफलेली माळही काळीच. आता प्रश्न पडेल की मोती कधी काळा असतो का? तर याचं उत्तर आहे हो. मोती काळ्या रंगाचेही असतात. आणि ते अत्यंत सुंदर असतात. निंजा हटोरी कार्टून मधला तो हथोडी आठवा. त्याच्या भावाचं नाव असतं. शिन जो.. म्हणजेच काळा मोती. ते पात्र इतकं निरागस आहे की त्याला ते नाव अगदी शोभून दिसतं. आणि एक... नेहमीच्या मोत्यांपेक्षा हे काळे मोती दुर्मिळ, म्हणूनच जास्त महाग असतात. काळ्या रंगाची किंमत जपानी मन जाणतं. आपणही जाणली पाहिजे. सर्व रंगाचं सारख्या प्रमाणात मिश्रण केलं तर काळा रंग तयार होतो. म्हणजे काळा रंग हा काळाहीन नव्हेच. सर्व रंग एकेठायी होतात तेव्हा तो काळा रंग होतो. म्हणूनच की काय, काळ्या काळ्या रंगात रंगलेलं आभाळ मग इंद्रधनुष्य प्रसवतं. गोऱ्या रंगाचं किती जरी कौतुक असलं तरी ‘गोरे गोरे मुखडे पे काला काला तिल’ किंवा ‘काला काला चष्मा’ असल्याशिवाय त्याचा करिष्मा दिसत नाही. निळं निळं आकाश साजरं खरंच, पण पावसाच्या नऊ नक्षत्रात त्याला काळा रंग यथेच्छ माखल्याशिवाय जग सप्तरंगी होणार तरी कसं?

बरखा रितु आयी रितु आयी

कारी कारी घटा चहुओर छायी

चमक बिजुरिया मनहु डरायी

असा सीन झाल्याशिवाय तप्त मन शीतल होत नाही. मल्हारची सुंदर चीज आहे ही...पं. शौनक अभिषेकी यांनी गायलेली. मल्हारच्या असंख्य चिजा आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातल्या कोणत्याच चिजेचा उल्लेख त्यात काली घटा आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काळ्या रंगाच्या मेघांसाठी तळमळतो आपण. काळ्याच्या एका उल्लेखाने प्रसन्न होतं मन.

आणि काही गोष्टी या काळ्याच असलेल्या छान दिसतात. उदाहरणार्थ केस. हे जर काळेभोर भुंगरी असले तरच ते खरे सुंदर दिसतात. आशा भोसले यांचं एक सुंदर खट्याळ गाणं आहे.

ये है रेशमी जुल्फों का अँधेरा न घबराइये

जहाँ तक महक है मेरे गेसुओं की चले आईये

काळ्याभोर रेशमी केसांसाठी चक्क काळोखाची उपमा वापरलीय इथे...काय लाजवाब वाटतो इथे आशाताईंच्या स्वरातला तो नखरा... स्वरांनी किती म्हणून बोलकं असावं! काळा ढग असतो, काळेभोर केस असतात. तसेच काळेभोर डोळेही मन खेचून घेतात. बंटी और बबलीमधलं अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स असणारं गाणं आहे. साक्षात ‘अमिताभ’जी इथे दिसले आहेत. आणि ‘ऐश्वर्या राय’चा तो तडका परफॉर्मन्स कुणी विसरूही शकणार नाही.

कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना चा शंकर महादेवन आणि टीमचा परफॉर्मन्स अजूनही तितकाच लोकप्रिय आहे. काही काही गाणी पूर्ण पिक्चरपेक्षा जास्त भाव खाऊन जातात. हे गाणं त्यातलंच एक.

एखाद्या काळ्या मुलाला कुणी चिडवलं की एखादी आजी म्हणते ‘अरे, देवाचे देव ते काळे असतात. का चिडवता त्याला?’ देवाचे देव काळे असतात...किती खरं आहे ना? कानडाउ विठ्ठलु कर्नाटकु सुद्धा काळाकुट्ट आहे. कृष्ण काळा असतो. राम सुद्धा गोरा नाहीच. नीलवर्ण. कर्पूरगौर महादेवांचा कंठही विषामुळे काळानिळा झालेला. गौरी जरी गोरीपान असली तरी अक्राळविक्राळ रूप असणारी काली मात्र काळीच मूर्ती असते. म्हणजे देवांनाही काळेपणा वर्ज्य नाही. मग आपण काळेपणा किंवा काळ्या माणसाच्या भावना समजून घ्यायला कमी पडतो की काय? आपल्या मनातले पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण काळ्या रंगाकडे पाहिलं तर त्यातला उजळपणा आपल्याला नक्कीच भावेल.

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.