महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशात प्रचंड राजकीय भूकंप

06:58 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशाच्या प्रमुख शेख हसीना यांचा पदत्याग : भारतात आगमन, सत्ता लष्कराच्या हाती जाणे शक्य

Advertisement

वृत्तसंस्था / ढाका

Advertisement

बांगलादेशमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने गंभीर वळण घेतले असून त्या देशाच्या प्रमुख शेख हसीना यांनी पदत्याग केला आहे. त्यांचे भारतात आगमन झाले असून त्यांनी भारतात आश्रय मागितला आहे. बांगला देशची सत्ता आता तेथील लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या त्या देशात प्रचंड गोंधळ आणि अराजकाचे वातावरण आहे. तेथे लष्कराच्या हाती सत्ता गेल्यास त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेले चार महिने या देशात विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन चालविले आहे. बांगला देशच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी भाग घेतला, त्यांच्या वारसदारांसाठी या देशात 30 टक्के जागा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या विरोधात तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन हाती घेतले होते. त्यानंतर तेथील सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाची मर्यादा 5 टक्क्यांवर आणली होती. त्यानंतर आंदोलन काहीसे शमल्यासारखे वाटत असतानाच त्याने गेल्या एका आठवड्यात पुन्हा उचल खाल्ली. ते अधिकच तीव्र झाले. गेल्या सात दिवसांमध्ये या आंदोलनात 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंपैकी 100 हून अधिक मृत्यू गेल्या दोन दिवसांमध्येच झाले आहेत. तेथे अराजकाची स्थिती आहे.

राजवाड्यावर हल्ला

सोमवारी सकाळपासून आंदोलन अधिकच तीव्र बनले. हजारो आंदोलकांनी थेट शेख हसीना यांचे निवासस्थान असणाऱ्या राजधानी ढाक्यातील राजवाड्यालाच वेढा घातला. लाठ्या-काठ्या आणि हत्यारे घेऊन आंदोलक वाड्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी तीन वाजताच आपले निवासस्थान सोडले आणि त्या लष्कराच्या हेलिकॉप्टरने भारतात येण्यास निघाल्या. त्यानंतर दोन तासांमध्ये त्या भारतात पोहचल्याचेही वृत्त बांगला देशचे प्रसारमाध्यम ‘प्रथम आलो’ ने प्रसिद्ध केले. भारताने अद्याप यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

लंडनला जाण्याची शक्यता

शेख हसीना या भारतात पोहचल्याच्या वृत्ताला तेथील लष्करी प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. हसीना या भारतात राजाश्रय मागतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास भारत त्यांना अनुमती देणार का हा प्रश्न आहे. आंदोलनाची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही. जाळपोळ, हत्या यांचे सत्र सुरुच आहे. भारतातून त्या लंडनला जाणार असल्याचेही वृत्त देण्यात आले आहे. भारतात उत्तर प्रदेशातील हिंडन विमानतळावर त्या आल्यानंतर वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या संध्याकाळी 5 वाजता उत्तर प्रदेशात आल्या.

म्यानमारसारखी स्थिती ?

बांगलादेशातील अराजकामुळे तेथे म्यानमारसारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्यानमारमध्ये लष्करानेच तेथील लोकनियुक्त सरकारविरोधात बंड करुन ती सत्ता उलथवून देश ताब्यात घेतला आहे. त्या देशाच्या लोकनियुक्त प्रमुख आऊंग सान सू की सध्या तेथील लष्कराच्या ताब्यात असून कारागृहात आहेत. काही अंतर वगळता बांगलादेशात म्यानमारसारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून भारत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

सत्ता लष्कराच्या हाती?

लोकनियुक्त देशप्रमुख शेख हसीना यांनी भारतात पलायन केल्याने बांगलादेशची अवस्था आता निर्णायकी झाली आहे. तेथे विरोधी पक्षाचे अस्तित्व नावापुरतेच आहे. त्यामुळे तेथील लष्करच त्या देशाची सत्ता हाती घेण्याची शक्यता असून तसे झाल्यास त्या देशातील परिस्थिती कशी होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यापही शेख हसीना यांच्या पक्षाला बहुमत असून त्याच पक्षाच्या हाती अधिकृतरित्या या देशाची सत्ता आहे. त्यामुळे आगामी काही काळात त्या देशातील चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अवामी लीगचे कार्यालय जाळले

बांगलादेशातील आंदोलनाची तीव्रता वाढत असून तेथील सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे ढाक्यातील मुख्यालय आंदोलकांनी जाळून टाकल्याचे वृत्त आहे. अवामी लीगच्या अन्य आस्थापनांनाही लक्ष्य करण्यात येत असून या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक यांच्यात अनेक स्थानी तुंबळ संघर्ष चालल्याचे दिसून येत आहे.

पर्यायी सरकारला साहाय्य करणार ?

सोमवारी घडलेल्या अनेक सनसनाटी घटनांनंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार उझ झमान यांनी संध्याकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यांनी शेख हसीना यांच्या पलायनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच देशाचे नियंत्रण हाती घेण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले. देशात निर्णायकी स्थिती येऊ देणार नाही. पर्यायी सरकार स्थापनेला लष्कर सहाय्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

‘वंगबंधू’चा पुतळा फोडला  

बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुक्तीवाहिनीचे नेते आणि बांगलादेशचे माजी दिवंगत प्रमुख शेख मुजिबूर रहमान यांचा ढाक्यातील पुतळा फोडण्यात आला असल्याचे वृत्त आहे. अनेक आंदोलक सोमवारी या पुतळ्यावर चढून त्याची नासधूस करतानाचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. इतरत्रही अनेक आस्थापनांचा चक्काचूर झाला आहे. अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरांनाही लक्ष्य केले जात आहे.

पाकिस्तानचे कारस्थान

बांगलादेशमधे घडणाऱ्या या घडामोडींमागे पाकिस्तानचा हात आहे काय, असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अनेक तज्ञांच्या मते या देशात ही उलथापालथ पाकिस्ताननेच घडविली आहे. तेथील सत्ताधारी अवामी लीग आणि या पक्षाच्या नेत्या शेख हसीना या भारताच्या बाजूच्या होत्या. त्यामुळे त्यांना सत्ताभ्रष्ट करुन पाकिस्तानला अनुकूल ठरेल असे प्रशासन या देशात आणणे, हे पाकिस्तानचे अनेक दशकांपासूनचे ध्येय आहे. असा प्रयत्न अनेकदा पाकिस्तानने केला आहे. मात्र, तो यशस्वी ठरला नव्हता. यावेळी यशस्वी ठरण्याची शक्यता आहे, असेही बोलले जात आहे. पाकिस्तानचे हे कारस्थान असल्यास भारताला यापुढे अधिकच सावध रहावे लागणार, असेही मत व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article