पालींच्या शेतीतून बख्खळ पैसा
पैसा मिळविण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येणे कठीण आहे. चीनमध्ये अनेक लोकांनी पैसा मिळविण्यासाठी पालींची शेती करण्याचा मार्ग पत्करला आहे. हे लोक लक्षावधींच्या संख्येने पाली पाळतात. त्यांना खायला घालून मोठ्या करतात आणि टोपल्या भरभरुन त्यांची विक्री करतात. या धंद्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होते, असे वृत्त आहे. चीन देशात अशा अनेक विचित्र परंपरा आहेत.
आता पालींची शेती का केली जाते, हा प्रश्न आपल्या मनात निश्चितच येणार आहे. कारण पालीला नुसते पाहिले तरी आपल्याला किळस येते. कित्येक लोकांना पाल पाहिल्यास जेवणही जात नाही. तथापि, भारतात अशा प्रकारे तिरस्कार केल्या जाणाऱ्या पाली चीनमध्ये अनेक लोकांच्या आहाराचा भाग असतात. पालींपासून त्या देशात अनेक खाद्यपदार्थ बनविले जातात आणि लोक ते चवीने खातात. ज्या प्राण्यांना किंवा सजीवांना आपण हातही लावत नाही, त्यांना चीनी लोक आनंदाने पोटात घालतात. गोगलगायी, वेगवेगळ्या प्रकारचे साप, अजगर साप यांच्या मांसाप्रमाणेच पालींचे मांस हा चीनी लोकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे लोकांची ही आवड भागविण्यसाठी चीनमध्ये पालींची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. चीनच्या ग्रामीण भागांमध्ये, विशेषत: दक्षिण चीनच्या गुआंगडोंग आणि गुआंगशी या विभागांमध्ये पालींची शेती हा एक महत्वाचा व्यवसाय आहे.
ही पालींची शेती अत्यंत व्यवस्थितरित्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. अनेक जातींच्या पालींची शेपटी ही विषारी असते. मात्र, पालींचा खाद्यपदार्थ म्हणून उपयोग करताना ही शेपटी काढून टाकली जाते. उरलेला भाग चविष्ट असतो, असे चीनमधील अनेक लोकांचे म्हणणे आहे. अर्थात, चीनच्या प्रत्येक भागात पाली खाल्ल्या जातात असेही नाही. चीनचा दक्षिण भाग पालींच्या आहारासाठी अधिक प्रसिद्ध आहे. पालीचा स्पर्श झाला किंवा कधीतरी ती अंगावर पडली, तरी भारतीयांना कसेतरी वाटते. पण याच पालींवर जगणारे लोक आपल्या शेजारच्याच देशात आहेत, याचे आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही, हे निश्चित.