पाकिस्तानात महागाईचा प्रचंड भडका
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानात सध्या महागाई शिगेला पोहचली आहे. टोमॅटोचा दर गगनाला भिडला असून किंमत 700 रुपये प्रतिकेलो इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे कांदा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची स्थिती असून सर्वसामान्य आणि गरीब लोक महागाईमुळे संत्रस्त आणि संतप्त झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
पाकिस्तानला टोमॅटोचा पुरवठा अफगाणिस्तान आणि इराणमधून केला जातो. तथापि, सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवर दोन्ही देशांमध्ये संघर्षाचा भडका उडाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. परिणामी, या मार्गांवरुन पाकिस्तानात होणारी मालाची निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक थांबली आहे. याचा परिणाम म्हणून पाकिस्तानात महागाईचा ज्वालामुखी उफाळून आला आहे. कित्येक जीवनावश्यक वस्तू बाजारातून गायब झाल्या असून अनेक जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे.
संघर्षामुळे सर्वसामान्य वेठीस
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सीमारेषेच्या वादावरुन नुकताच एक सशस्त्र संघर्ष झाला आहे. या संघर्षात पाकिस्तानचे कित्येक सैनिक ठार झाले आहेत. तर पाकिस्तानने केल्या दोन आठवड्यांमध्ये चारवेळा अफगाणिस्तानच्या शहरांवर वायूहल्ले चढविले आहेत. तर आफगाणिस्तानच्या सैनिकांनी पाकिस्तानात घसून त्यांच्या विरोधकांवर हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी घडवून आणली होती. या घडामोडींची पार्श्वभूमीही महागाईला आहे.