‘अतिथी’ करतायत पर्यटनाची माती!
‘गोवा मे सबकुछ चलता है’ धारणेतून बेधुंद व्यवहार : वाहनांवरील स्टंटबाजीच्या प्रकारांत प्रचंड वाढ,पोलीस, वाहतूक खात्याकडून मिळते खतपाणी
जय नाईक/पणजी
‘गोवा मे सबकुछ चलता है’, अशी ठाम समजूत करूनच घरातून बाहेर पडलेले खास करून देशी पर्यटक राज्याच्या सीमेवर पोहोचताक्षणीच ‘गळ्याखाली घोट’ उतरवतात आणि नंतर बेधुंद होतात. त्यानंतर त्यांच्यासाठी गोवा म्हणजे ‘रिपब्लिक ऑफ डू एनिथिंग’ राज्य बनते. असे पर्यटक नंतर येथे आल्याआल्या अनंत कारनामे करतात. त्यापैकी काहीजण वाहनांवरील स्टंटबाजी करण्यात धन्यता मानतात. परंतु असे करताना आपण कायद्याची पायमल्ली तर करतोच, त्याहीपेक्षा स्वत:चा जीव धोक्यात घालतो याचेही भान त्यांना राहात नाही. गोव्यात एक तर ‘कायदाच अस्तित्वात नाही’ किंवा ‘हम करे सो कायदा’, अशा थाटात ते वावरत असतात. हे प्रकार कालपरवाच घडू लागले आहेत, अशातला भाग नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून अधुनमधून असे प्रकार घडत आहेत. राज्यात ‘रेन्ट अ कार’ हा व्यवसाय अस्तित्वात आल्यापासून त्या प्रकारात मोठी वाढ दिसून आली आहे. काहीजण स्वत:च्या वाहनांवरही अशी स्टंटबाजी करताना अनेकांच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत.
धोकादायक मौजमस्ती
आश्चर्यकारक बाब म्हणजे वाहतूक पोलिस आणि वाहतूक अधिकारी या प्रकारांकडे सोयिस्कर दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळेच अशा पर्यटकांना चेव चढतो आणि ते अधिकच बेभान होतात. त्यापैकी काहीजण चालत्या वाहनाचे दरवाजे उघडतात, दरवाजाच्या खिडक्यांमधून अर्धे शरीर बाहेर काढत मोठमोठ्याने ओरड-किंचाळ्या मारत इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधतात, काहीजण मागे लावलेल्या स्टेपनीवर बसतात तर काहीजण त्याही पुढे जाताना थेट कारच्या टपावरच बसतात-नाचतात, असे कैक कारनामे करतात.
गाडीवर दाऊकामाची आतषबाजी
या सर्वांवर कडी करताना हल्लीच एका महाभागाने तर चालत्या कारच्या टपावरून चक्क दाऊकामाची आतषबाजी करण्याचे धाडस केले होते. हा ‘प्रताप’ त्याने अटल सेतूवर केला होता हे विशेष. महत्वाचे म्हणजे असे प्रताप आणि प्रकार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बहुतांश गाड्या या ‘रेन्ट अ कार’ व्यावसायिकांच्या होत्या. अशा गाड्या एकदा हाती पडल्या म्हणजे पर्यटक कोणताही धरबंध न ठेवता त्या हाकतात. त्यातून अनेकांचे बळी घेतले जातात. त्यातून कुणाचा तरी भरला संसार उद्ध्वस्थ होत असतो. परंतु त्याचे कुणालाही सोयरसुतक नसते.
‘गोवा मे सबकुछ चलता है’
‘गोवा मे सबकुछ चलता है’ अशी धारणा करून आलेले हे पर्यटक मिळेल तेथून आणि मिळेल तसे वाहन चालवतात. काहीजण थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत वाहने नेण्याचेही धाडस करतात. याला कारण म्हणजे येथे कायद्याची कोणतीही भीती नाही. काहीही केले, कसेही वागले तरी कुणी विचारणार नाही, असाच त्यांचा समाज असतो. या समजाला खतपाणी घालण्याचे काम खुद्द पोलीस आणि वाहतूक खातेच करत असते. म्हणुनच त्यांना चेव चढतो आणि उर्मी उफाळून येते असते.