अवकाळी पावसामुळे रोगराईत मोठी वाढ
डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियाचे रुग्ण आढळले : डास नियंत्रणासाठी प्रत्येकाने घराभोवती स्वच्छता राखावी
बेळगाव : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू यासारख्या संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून ते आतापर्यंत 17 जणांना डेंग्यू, 5 जणांना चिकुनगुनिया आणि एकाला मलेरिया झाल्याचे निदान झाले आहे. गतवर्षी 106 जणांना डेंग्यू, 67 चिकुनगुनिया आणि 9 जणांना मलेरिया झाल्याचे निदान झाले होते. अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्या पाण्यावर अळ्या तयार होऊन संसर्गजन्य रोगांचा फैलाव वाढत चालला आहे. दरवर्षी डेंग्यूच्या रुग्णात वाढ होत आहे. विशेष करून मे ते ऑगस्ट या दरम्यान डेंग्यू आणि चिकुनगुनिया या दोहोमध्ये वाढ होते. याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे जिल्हा सांसर्गिक रोग नियंत्रणाधिकारी डॉ. विवेक होनळ्ळी यांनी म्हटले आहे.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी देखील आरोग्य विभाग, पंचायत राज विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रोगनियंत्रणासाठी खबरदारीच्या उपाययोजना घेण्याची सूचना केली आहे. संसर्गजन्य रोगांपैकी विशेष करून डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा संबंधित गावपातळीवर अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्याची सूचना देखील त्यांनी केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर योग्यप्रकारे खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी गटारी व नाले सफाई करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी ठिकठिकाणी तुंबले असल्याने त्यावर डासांची पैदास होत आहे. जनतेने आपल्या घराभोवती स्वच्छता राखून घरात जास्त दिवस पाणी साठवून न ठेवता साठवलेले पाणी वारंवार खाली करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक
डेंग्यूसह इतर आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी देखील सहकार्य करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा कार्यकर्त्या घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत.
- राहुल शिंदे, जि. पं. सीईओ
संसर्गजन्य रोगांबाबत जनजागृती
संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच डास व अळ्यांचा शोध घेऊन त्यांचा नाश केला जात आहे. डास नियंत्रणासाठी प्रत्येकाने आपापल्या घराभोवती स्वच्छता राखली पाहिजे.
- डॉ. विवेक होनळ्ळी,जिल्हा सांसर्गिक रोग नियंत्रणाधिकारी