Karad News : नगरपरिषद निवडणुकीपूर्वी कराडमध्ये विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी
कराडमध्ये ७५० विद्यार्थ्यांची मानवी साखळी
कराड : कराड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड येथे सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदान करा हे शब्द साकारून मतदार जागृती करण्यात आली. यावेळी स्वीप पथकाचे संतोष डांगे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील, शहरातील मतदारांना कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये १०० टक्के मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.
नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का बाढावा यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळी, रांगोळी, पथनाटय आदी कार्यक्रमाव्दारे मतदारांत जनजागृती करण्यात येत आहे.
कराड येथील मंगळवार पेठ परिसरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी शिंदे, प्रशांत व्हटकर, सहाय्यक महसूल अधिकारी युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील परीट यांनी केले. आनंदराव जानुगडे यांनी सूत्रसंचालन केले. शाळेचे मुख्याध्यापक के. पी. बाघमारे यांनी स्वागत केले. ऋषिकेश पोटे यांनी आभार मानले. या उपक्रमात शाळेचे उपमुख्याध्यापक एस. एस. शिंदे, पर्यवेक्षक पी. आर. मोरे, एस. एस. कान्हे, कलाशिक्षक एस. एस. कांबळे, कोअर कमिटी सदस्य एस. एस. मोरे, जे. एस. पवार, क्रीडाशिक्षक जी. एम. पवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
मतदान जागृतीची शपथ
उपक्रमांतर्गत टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्याथ्यांनी मानवी साखळी करून मतदान करण्याचा संदेश दिला. तसेच शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांकडून मतदार जागृती करण्यासंदर्भात शपथ घेण्यात आली.