बिनखांबी प्रचंड सभागृह
कोणत्याही सभागृहाचा आकार मोठा असेल त्याचे छत तोलण्यासाठी अनेक खांबांची योजना केलेली असते याची सर्वांना माहिती आहे. कित्येकदा हे खांब सभागृहाच्या मधल्या भागातही बसवावे लागतात. त्यामुळे सभागृहाचा भक्कमपणा वाढत असला तरी अशा खांबांमुळे समोरचे दिसण्यात अडथळा येतो. त्यामुळे संपूर्ण सभागृहाचा एकाचवेळी उपयोग करणे अशक्य होते. परिणामी चित्रपटगृहे, मंगलकार्यालये किंवा सार्वजनिक कार्यक्रमासाठीच्या सभागृहांमध्ये मधल्या भागात खांब घातले जात नाहीत.
पण तसे केल्याने सभागृहांचा आकार मर्यादित ठेवावा लागतो. तथापि, सिरोही येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेने एका अशा सभागृहाची निर्मिती केली आहे, की ज्यात एकाचवेळी 25 हजार लोक बसू शकतात. पण या सभागृहात एकही खांब नाही. त्यामुळे ते आशिया खंडातील सर्वात मोठे बिनखांबी सभागृह ठरले आहे. या सभागृहात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी महनीय व्यक्तींचे कार्यक्रम झाले आहेत. या सभागृहाची निर्मिती 1996 मध्ये प्रसिद्ध अभियंता रमेश कुंवर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केली. तेव्हापासून तो जगप्रसिद्ध आहे. त्यावेळी या सभागृहाच्या निर्मितीसाठी 3 कोटी रुपयांचा खर्च आलेला होता. संपूर्ण आशिया खंडात चीन, जपान किंवा दक्षिण कोरिया तसेच सिंगापूर आदी आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न असणाऱ्या देशांमध्येही इतके मोठे खांब नसलेले सभागृह अद्याप निर्माण करण्यात आलेले नाही. हा एक विक्रम भारताच्या नावे आहे.