विद्युत अपघातात महाराष्ट्र देशात दुसरा! केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार महावितरणचा कारभार चव्हाट्यावर
एकूण अपघातांमध्ये महावितरणचे सुमारे 95 टक्के अपघात; महावितरणच्या निकृष्ठ कारभारामुळे मानवी अपघाताचा चढता आलेख कायम; विद्युत सुरक्षेबाबत ठोस धोरण नाही
कृष्णात चौगले कोल्हापूर
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार विद्युत अपघातामध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई शहर वगळता राज्यात सर्वत्र महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे झालेल्या एकूण अपघातांमध्ये 95 टक्केंहून अधिक वाटा हा महावितरणचा आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे विद्युत सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष, ठोस धोरणाचा अभाव आणि निकृष्ट कामांमुळेच महाराष्ट्राने विद्युत अपघातामध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्याची ‘अपकीर्ती’ मिळवली आहे. तरीही महावितरणच्या निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना त्याबाबतचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे.
3 कोटी ग्राहक संख्या संख्या असलेली महावितरण ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. मुंबई वगळता राज्यातील प्रत्येक कुटूंब हे महावितरणशी जोडले गेले आहे. ‘समृद्धीचे विकासाचे नाते प्रकाशाचे, ग्राहक समाधान हे ध्येय महावितरणचे’ हे ब्रीद घेऊन गेली 19 वर्षे महावितरण कार्यरत आहे. ग्राहकांच्या ताकदीवर उभारलेल्या या सर्वोच्च कंपनींच्या अधिकाऱ्यांना मात्र आपणच या कंपनीचे मालक आहोत असा गैरसमज झाल्यामुळे त्यांच्याकडून विद्युत सुरक्षा अर्थात ग्राहक सुरक्षेला नगण्य स्थान दिले जात असल्याचे वास्तव आहे. महावितरणकडून विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना राबवली जात नसल्यामुळे वीज अपघातांमध्ये राज्यात हजारो नागरीकांचा बळी जात आहे. ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांमध्ये असलेली मिलीभगत यामुळेच सक्षम विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी दिला जाणारा निधी अन्यत्र मुरतो. परिणामी उभारल्या जाणाऱ्या ‘अक्षम’ वीज यंत्रणेमुळेच ग्राहकांचा बळी जात आहे.
महाराष्ट्रात तीन वर्षात 2022 नागरिक दगावले
राज्यात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन शासकीय कंपन्या वीज क्षेत्रात काम करतात. याशिवाय मुंबई शहरामध्ये खासगी वीज कंपन्यांकडून वीज पुरवठा केला जातो. यामध्ये सर्व शासकीय कंपन्यांचा विचार करता मानवी अपघातामध्ये महावितरण अग्रस्थानी आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अहवालानुसार देशात मानवी विद्युत अपघातामध्ये उत्तरप्रदेश पहिल्या स्थानावर तर महाराष्ट्र अर्थात महावितरण दुसऱ्या स्थानावर असल्याचे तीन वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अपघातांची खरी आकडेवारी आणखी किती मुरवली आहे ? हा देखील संशोधनाचा विषय आहे. तरीही केंद्र शासनाच्या अहवालानुसार राज्यात 2019-20 सालात एकूण 4267 विद्युत अपघात झाले आहेत. यामध्ये 705 नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या उत्तरप्रदेशातील स्थिती पाहता तेथे याच वर्षात 3753 एकूण अपघात झाले असून 1132 नागरीक दगावले आहेत. 2020-21 सालामध्ये राज्यात 3301 एकूण अपघात झाले आहेत. यामध्ये 730 नागरीकांचा हाकनाक बळी गेला आहे. या सालातील उत्तर प्रदेशमधील स्थिती पाहता 3248 वीज अपघातांमध्ये 1113 जण मृत्यूमुखी पडले आहेत. 2021-22 मध्ये महाराष्ट्रात 3045 एकूण अपघात झाले आहेत. त्यामध्ये 587 जण दगावले आहेत. याच वर्षात उत्तर प्रदेशात 3770 एकूण वीज अपघात झाले असून त्यामध्ये 1279 नागरिक दगावले आहेत.
विद्युत सुरक्षेच्या जनजागृतीची केवळ ‘नौटंकी’
राज्यातील सहा प्रशासकीय विभागांत 36 जिल्हे, 358 तालुके, 534 शहरे तर 43 हजार 664 गावे आहेत. यामध्ये मुंबई वगळता सर्वत्र महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. पण 3 कोटी ग्राहक संख्या असलेल्या महावितरणकडे विद्युत सुरक्षेबाबत कोणतेही ठोस धोरण नसल्याचे वेळोवेळी होणाऱ्या विद्युत अपघातांतून समोर आले आहे. राज्यात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती केली जात असल्याबाबत महावितरणकडून डांगोरा पिटला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र 10 टक्केंपेक्षा कमी गावे आणि शहरांतच जनजागृती केली जात असल्याचे वास्तव आहे. वास्तविक प्रत्येक जिह्यात सुरक्षा अधिकऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे उभारल्या जाणाऱ्या विद्युत यंत्रणेची तपासणी आणि विद्युत सुरक्षेबाबत जानजागृतीची जबाबदारी देणे आवश्यक आहे. जनजागृतीचा कागदोपत्री कारभार करण्याऐवजी सातत्यपूर्ण व्यापक जनजागृती आवश्यक आहे.
वसुलीला प्राधान्य, देखभाल दुरुस्तीकडे दूर्लक्ष
महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वीज बिल वसुलीला प्रथम प्राधान्य दिले जाते. बिल वसूल करणे हेच आपले आद्यकर्तव्य असल्याची त्यांची भावना आहे. बिलातून प्राप्त होणारी रक्कम हे महावितरणचे प्रमुख अर्थिक स्त्राsत असल्यामुळे त्याची वसूली करणे क्रमप्राप्त असले तरी विद्युत सुरक्षेलाही तितकेच महत्वाचे स्थान देणे आवश्यक आहे. त्यामुळे कमजोर झालेली यंत्रणा सक्षम करणे, वीज वाहक तारा तुटून, वीज खांबातून वीज प्रवाह जमिनीत उतरून होणार अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्याची गरज आहे याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष देणे अत्यावश्यक आहे. ज्या तळमळीने ‘अर्थ’पूर्ण काम केले जाते, त्याच तळमळीने विद्युत सुरक्षेलाही प्राधान्य दिल्यास मानवी अपघात निश्चितपणे कमी होतील.