कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हलसाल येथे हत्तींच्या कळपाकडून प्रचंड नुकसान

12:46 PM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वनखात्याच्या निष्काळजीपणामुळे हाता-तोंडाशी आलेले भातपीक वाया जाण्याची भीती : शेतकरी हतबल

Advertisement

खानापूर : तालुक्यातील पडलवाडी-हलसाल भागात दांडेली जंगलातून आलेला हत्तींचा कळप गेल्या चार दिवसापासून ठाण मांडून आहे. रविवारी आणि सोमवारी दिवसभरात आठ हत्तीच्या कळपानी हलसाल येथील कापणीला आलेल्या भात पिकाच्या शिवारात धुडगूस घालून भातपिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले भातपीक हत्तींच्या धुडगुसामुळे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. तालुक्यात सर्वच भात शेतीची सुगी सुरू झाली असल्याने हत्तींच्या कळपाकडून कापणीला आलेल्या भाताचे नुकसान होत असल्याने वनखात्याने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

गेल्या महिन्याभरापूर्वीपासून दांडेली जंगलातील हत्तींचे कळप नागरगाळी जंगलात आले आहेत. या हत्तींचे कळप नागरगाळी, शिवठाण, शिंदोळी परिसरातून आता कापोली, हलसाल, पडलवाडी या परिसरात गेल्या चार दिवसापासून स्थिरावले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने भातकापणीचा हंगाम अगदी टिपेवर आला आहे. यावर्षी भातपीक चांगल्या स्थितीत असल्याने शेतकरी भाताची मळणी करून पीक घरी घेऊन येण्याच्या घाई गडबडीत लागला आहे. अशातच हत्तींच्या कळपाने धुडगूस घातला असून, तालुक्याच्या नागरगाळी, शिवठाण, गुंजी, लोंढा आणि आता कापोली परिसरात हत्तीनी थैमान घातले आहे.

आठ हत्तींच्या कळपाकडून संपूर्ण भातपट्टीच उद्ध्वस्त 

हलसाल येथील शेतकरी लक्ष्मण गंगाराम तांबूळकर, पंकज तांबूळकर, मारुती तांबूळकर यांच्या शेतात आठ हत्तींच्या कळपाने रविवारी रात्री संपूर्ण भात शेतीची पट्टीच पूर्णपणे उदध्वस्त केल्याने जवळपास 50 पोत्याच्या भात पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसान पाहून लक्ष्मण तांबूळकर हे हताश झाले आहेत. वनखात्याचे योग्य नियोजन नसल्याने हत्तीकडून पिकांचे नुकसान होत आहे. हत्तींची समस्या गेल्या अनेक वर्षापासून सतावत आहे. मात्र वनखात्याकडून हत्तोRच्या बंदोबस्ताविषयी कोणताच क्रम घेण्यात येत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांनी वनखात्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या डोईजड

हत्तीच्या बंदोबस्ताची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतीच नकोसी झाली आहे. काबाडकष्ट करुन पिके वाढावयाची आणि पिके हाता-तोंडाशी येतात. त्याचवेळी वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात  येते.वनखात्याकडून या नुकसानीची तटपुंजी भरपाई मिळते. ती मिळवण्यासाठी कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी वनखात्याच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. आणि वर्ष, दोन वर्षानंतर अगदी तटपुंजी नुकसानभरपाई देण्यात येते. त्यामुळे ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना डोईजड झाली आहे.

हत्तींचा बंदोबस्त करा

हत्तीसह इतर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, म्हणून वेळोवेळी मागणी करुनदेखील वनखात्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. ऐन सुगीच्या हंगामात हत्तीनी तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची नाकीनऊ आली आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधीनीही वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी  कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. तसेच वन्य प्राण्यांबाबत वनखात्याकडे कोणताही पाठपुरावा केला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांना वालीच नसल्याचे चित्र गेल्या दोन वर्षापासून दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article