विठुनामाच्या जयघोषात शहर तल्लीन
शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी : मंदिरांना फुलांसह विद्युत रोषणाई : विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींना फुलांची आरास
बेळगाव
‘उदंड पाहिले, उदंड ऐकिले,
उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे
ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर,
ऐसा विठेवर देव कोठे?’
संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी विठुरायाचे वर्णन करताना हा सुंदर अभंग लिहिला आहे. जात, पात, धर्म, भेद न मानणाऱ्या वारकरी संप्रदायाकडून आषाढी एकादशीचे मनोभावे आचरण करण्यात आले. यानिमित्त बेळगाव शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांना फुलांसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बेळगाव शहरात विठ्ठल-रखुमाईची अनेक पुरातन मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये रविवारी सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. विठ्ठलाचा गजर करत सर्वत्र भजन, कीर्तन केले जात होते. अनेक ठिकाणी धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहापूर येथील विठ्ठल मंदिर
बेळगाव शहरातील प्राचीन विठ्ठल मंदिर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठलदेव गल्ली, शहापूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात भाविकांची रविवारी सकाळपासूनच गर्दी झाली होती. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीला फुलांची आरास करण्यात आली होती. पहाटे पवमान अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विविध पूजा व आरती झाली. दुपारी महिलांचे प्रासादिक भजन झाले. सायंकाळी वेदोक्त मंत्रपुष्पांजली तसेच स्थानिक वारकऱ्यांचे भजन झाले. सायंकाळी हेरंब देऊळकर यांचे वाल्मिकी रामायणावर प्रवचन झाले.
बापट गल्ली विठ्ठल मंदिर
बापट गल्ली कार पार्किंग येथे पहाटे 6 वाजता काकडारती, भजन व अभिषेक सोहळा पार पडला. सकाळी सुहास किल्लेकर, सदाशिव हिरेमठ, रमाकांत कोंडुसकर, शिवाजी हंगिरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. आई फाऊंडेशनच्यावतीने बापट गल्ली येथे विठ्ठल मंदिरासमोर खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य मोहन कांबळे, अरिफ मल्लेवाले, वैशाली कोणे, रेणुका पाटील, धनराज रतन, गोपाळ देसूरकर, मंजुनाथ कांबळे, चेतन कांबळे यासह इतर उपस्थित होते. 500 हून अधिक भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
नामदेव विठ्ठल मंदिर, शहापूर
शहापूर येथील नामदेव विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मनोहर पाटुकले यांनी पौरोहित्य केले. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांमध्ये आरास करण्यात आली होती. शहापूर, वडगाव परिसरातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
बाजार गल्ली, वडगाव
बाजार गल्ली, वडगाव येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला फुलांची आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मैत्रेयी कला मंचतर्फे कवितांचा कार्यक्रम झाला. जागृती महिला स्वावलंबन केंद्रातर्फे विष्णू सहस्रनाम पठण करण्यात आले. सायंकाळी शंकर पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम पार पडला. दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
ज्ञानेश्वर विठ्ठल मंदिर, महाद्वार रोड
महाद्वार रोड येथील ज्ञानेश्वर विठ्ठल रखुमाई मंदिराच्यावतीने रविवारी शहरातून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात भर पावसात वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. महाद्वार रोड येथून सुरुवात झालेल्या या पालखीला कपिलेश्वर मंदिर, शनि मंदिर, टिळक चौक, किर्लोस्कर रोड, शनिवार खूट, चव्हाट गल्ली, सोन्या मारुती चौक, आरटीओ सर्कल, मध्यवर्ती बसस्थानकमार्गे पुन्हा महाद्वार रोड येथे सांगता झाली. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्योतिर्लिंग मंदिर, नार्वेकर गल्ली
नार्वेकर गल्ली ज्योतिर्लिंग मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची आरास करण्यात आली होती. ज्योतिर्लिंग देवाला सकाळी लघुरुद्राभिषेक, त्यानंतर ज्योतिर्लिंग देवाची व विठ्ठलाची आरती करून भक्तांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. या निमित्ताने भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठल दर्शनाची आस...275 कि. मी. सायकल प्रवास!
गाडेमार्ग, शहापूर येथील 66 वर्षीय विठ्ठलभक्त परशराम खोबाण्णा लाड यांनी सायकलवरून बेळगाव ते पंढरपूर असा 275 किलोमीटरचा सायकलप्रवास केला. शुक्रवारी ते बेळगावहून निघाले होते व रविवारी सकाळी पंढरपूरला पोहोचले. या निमित्ताने लोकमान्य श्रीराम मंदिराचे सेवेकरी सुधीर कालकुंद्रीकर, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम वारकरी एकता संघ शहापूरचे महेश कंग्राळकर यांच्या हस्ते परशराम लाड यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर येथील जोतिबा मंदिर दर्शनासाठी आठ वेळा सायकल प्रवास केला असून यावर्षी पंढरपूरला जाण्याचा संकल्प केला होता.
