हुदली लक्ष्मीयात्रेला आजपासून प्रारंभ
तब्बल 11 वर्षांनंतर यात्रेचे आयोजन : 22 रोजी सांगता : धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर /बाळेकुंद्री
बेळगाव तालुक्यातील हुदली गावची ग्रामदेवता श्रीमहालक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार दि. 14 पासून 22 मे पर्यंत चालणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजनाचे खेळ होणार आहेत. गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या विस्तीर्ण जागेत लक्ष्मी मूर्तीला गदगेवर स्थानापन्न करण्यासाठी भव्य मंडप उभारणीचे काम तसेच सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर व मंडप रंगिबेरंगी प्लास्टिकच्या फुलांनी सजविले असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि पडद्यांची वैशिष्ट्यापूर्ण डिझाईन बनवून मंदिर सुशोभित करण्यात आले आहे. लक्ष्मीदेवीचे भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे म्हणून मंदिरात पुऊष व महिला भाविकांसाठी खास नियोजन करण्यात आले आहे. यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मारिहाळ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी बेळगाव डीएसपी व मारिहाळ पोलीस ठाण्याचे सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी यांनी मंडप परिसर व ईतर ठिकाणची पाहणी करून पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या. भाविकांच्या आरोग्य, पिण्याच्या पाण्याची खबरदारी घेण्यात आली आहे.
यात्रोत्सवातील कार्यक्रम
14 मे रोजी पहाटे महालक्ष्मी देवीचा विवाह संपन्न होईल. त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडेल. बुधवार दि. 15 मे रोजी दुपारी दोन वाजता देवीच्या उत्सवमूर्तीला प्रारंभ हेणार आहे. त्यानंतर अंकलगी संस्थान मठाचे प.पू अमरसिध्देश्वर स्वामीजींच्या हस्ते रथोत्सवाला सुरुवात होईल. गुरुवार व शुक्रवार रोजी गावच्या प्रमुख गल्लीतून रथाची मिरवणूक निघेल. दुपारी 4 वाजता देवी गदगेवर विराजमान होईल. नंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रम पार पडतील. 18 मे रोजी सकाळी 10 वा. घोड्याच्या शर्यतींचे आयोजन व ऑर्केस्ट्रा, 19 मे रोजी सकाळी 9 गाडी पळविण्याची शर्यत. दुपारी 3 वा. लहान कुस्त्यांचे आयोजन. 20 रोजी स्लो बाईक स्पर्धा व दुपारी मोठ्या जंगी कुस्त्यांचे आयोजन. 21 रोजी ट्रॅक्टर रिव्हर्स स्पर्धेचे आयोजन. रात्री नाटक होईल. 22 मे रोजी सकाळी मान्यवरांचा सत्कार तर दुपारी लक्ष्मी सीमेला गेल्यानंतर यात्रेची सांगता होईल.