हुबळी-पुणे वंदे भारतला घटप्रभा स्थानकावर थांबा द्या
खासदार जगदीश शेट्टर यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : हुबळी-बेळगाव-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा घटप्रभा येथील थांबा मागील आठ दिवसांपासून रद्द करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. बेळगाव जिल्ह्यात घटप्रभा येथे दुसरा थांबा मिळाल्यामुळे प्रवासी संख्या वाढली होती. त्यामुळे वंदे भारतला घटप्रभा येथील थांबा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे हुबळी-बेळगाव वंदे भारतला नवीन थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून घटप्रभा रेल्वेस्थानकावरील वंदे भारतचा थांबा रद्द करण्यात आला. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. गोकाक, घटप्रभा, रायबाग, कुडची या भागातील प्रवाशांना वंदे भारतचा प्रवास करता येत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करून घटप्रभा रेल्वेस्थानकावर वंदे भारत पुन्हा थांबवावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.