तृतीयपंथीयांच्या आरोग्यासाठी हुबळीत ‘संपूर्ण’ बाह्यारुग्ण विभाग
केएलई संस्थेचा हुबळीत उपक्रम : उत्तम आरोग्य, प्रत्येकाचा आदर करणे सार्थ ठरतेय संस्थेचे धोरण : मुनवळ्ळी
बेळगाव : केएलई रुग्णालयामार्फत प्रथमच तृतीयपंथीयांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने ‘संपूर्ण’ या नावाने बाह्यारुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकाला उत्तम आरोग्य, प्रत्येकाचा आदर करणे हे संस्थेचे धोरण सार्थ ठरत असल्याचे प्रतिपादन केएलई संस्थेचे संचालक शंकरण्णा मुनवळ्ळी यांनी केले. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हुबळी येथील केएलई जगद्गुरु गंगाधर महास्वामी मुरुसावीरमठ वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयामार्फत (जे.जे.एम.एम.सी.) ‘संपूर्ण’ (ट्रान्सजेंडर क्लिनिक) या नावाने समुदाय वैद्यकीय बाह्याऊग्ण विभागाचे उद्घाटन बुधवारी (दि. 19) करण्यात आले. गब्बुरू कॅम्पस हुबळी येथील केएलई रुग्णालय- संशोधन केंद्रामध्ये हा विभाग सुरू करण्यात आला असून याप्रसंगी मुनवळ्ळी बोलत होते.
एसएमएआरए सोसायटीच्या संचालक राजरत्ना हरिगल म्हणाल्या, हुबळीच्या केएलई ऊग्णालयाने ट्रान्सजेंडर क्लिनिक सुरू करून नवा उपक्रम राबविला आहे. याबद्दल संस्थेचे अभिनंदन करता येईल. केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च (काहेर) आरोग्य, शिक्षण, संशोधनात आघाडीवर असून ही संस्था एक शतकाहून अधिक वर्षे समाजसेवेसाठी समर्पित आहे. संपूर्ण या बाह्यारुग्ण विभागात विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. कर्नाटकातील खासगी वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयात केएलई संस्था ही संपूर्ण नावाने समुदाय आरोग्य चिकित्सालय सुरू करणारी पहिली संस्था असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी केएलईचे संचालक डॉ. व्ही. एस. साधुन्नवर, डॉ. व्ही. डी. पाटील, केएलई टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे डॉ. अशोक शेट्टर, डॉ. एच. एच. कुकनूर, डॉ. एल.रामकृष्णन आदी उपस्थित होते.