हुबळी-धारवाड पोलीस दिल्ली पोलिसांच्या संपर्कात
दहशतवादी शहानवाझचे हुबळी-धारवाडशी कनेक्शन असल्याचा संशय
बेंगळूर : आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या दहशतवादी शहानवाझ उर्फ शफी उज याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शहानवाझच्या अटकेनंतर त्याचे कर्नाटकाशी लागेबांधे असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे कर्नाटक पोलीस दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहेत. हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना आम्ही सातत्याने दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहे. अटकेतील संशयित दहशतवाद्याचे हुबळी-धारवाड कनेक्शन असल्याचे आढळल्याने माहिती जमविली जात आहे. दिल्ली पोलिसांनी अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली जात आहे, असे सांगितले. शहानवाझला रविवारी रात्री दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. राष्ट्रीय तपास पथकाला (एनआयए) हवा असणाऱ्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी तो एक आहे. यापूर्वी पुणे पोलिसांच्या ताब्यातून निसटून फरार झालेला शहानवाझ दिल्लीत वास्तव्यास होता. त्याच्याविषयी माहिती देणाऱ्यांना 3 लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. इंजिनिअर असणाऱ्या शहानवाझला दिल्लीच्या आग्नेय भागात पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. त्याची कसून चौकशी केली जात आहे.