बेळगाव-गोवा चेनस्नॅचिंग प्रकरणी हुबळीतील जोडगोळीला अटक
टिळकवाडी पोलिसांची कामगिरी : 9 लाखांच्या दागिन्यांसह दोन मोटारसायकली जप्त
बेळगाव : बेळगाव व गोव्यात झालेल्या चेनस्नॅचिंग प्रकरणी हुबळी येथील एका जोडगोळीला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 9 लाख 15 हजार रुपये किमतीचे 80 ग्रॅम 36 मिलि सोन्याचे दागिने व चेनस्नॅचिंगसाठी वापरण्यात आलेल्या दोन मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी पत्रकारांना सदर माहिती दिली. अमन दीपक राऊत (वय 22) मूळचा राहणार चितली स्टेशन, ता. राहता, जि. अहमदनगर सध्या राहणार गंगाधरनगर, हुबळी, नागराज बसाप्पा हरणशिकारी (वय 19) मूळचा कौलूर, ता. कोप्पळ, सध्या राहणार गंगाधरनगर, हुबळी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 25 ऑक्टोबर रोजी हिंदवाडी परिसरात झालेल्या चेनस्नॅचिंगचा तपास करताना या जोडगोळीला अटक करण्यात आली आहे.
मुसक्या आवळणाऱ्या पोलीस पथकाला बक्षीस जाहीर
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, महेश पाटील, एस. एम. करलिंगन्नावर, लाडजीसाब मुलतानी, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, शिवकुमार कर्की व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या जोडगोळीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
गेल्या महिन्यात घडलेल्या तिन्ही गुन्ह्यांची कबुली
बेळगाव शहरातील टिळकवाडी, एपीएमसी व खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या तीन चेनस्नॅचिंग प्रकरणांबरोबरच गोवा येथील मडगाव पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दोन चेनस्नॅचिंग प्रकरणांचीही या जोडगोळीने कबुली दिली आहे. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी येथे एका वृद्धेच्या गळ्यातील चेन पळविली होती. बेळगावात गेल्या महिन्यात घडलेल्या बहुतेक तिन्ही गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे.
अमन व नागराज हे दोघेही व्यवसायाने गवंडी कामगार आहेत. बेळगावात येऊन ते चेनस्नॅचिंग करायचे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचा शोध घेण्यात आला आहे. या तपासकामात पोलीस दलातील तांत्रिक विभागाचीही मदत झाली आहे.