एचएस प्रणॉय, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था /सिडनी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्मा यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले. या स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात पाचव्या मानांकित प्रणॉयने इस्त्रायलच्या मिशा झिलबेरमनचा 21-17, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेटवच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. प्रणॉयला विजयासाठी 46 मिनिटे झगडावे लागले. मात्र दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या समीर वर्माला सिंगापूरच्या लोह येवने चांगलेच झुंजविले. या लढतीत समीर वर्माने येवचा तब्बल 65 मिनिटांच्या कालावधीत 21-14, 14-21, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
आता शुक्रवारी या स्पर्धेत प्रणॉयचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानच्या नारोकाशी तर समीर वर्माचा सामना चीन तैपेईच्या लिन बरोबर होणार आहे. पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचे आव्हान संपुष्टात आले. जपानच्या निशीमोटोने जॉर्जचा 2 2-20, 21-6 असा पराभव केला. महिलांमध्यश भारताच्या 8 व्या मानांकित आकर्षि कश्यपने तेओचा 21-16, 21-13 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. आकर्षिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चीन तैपेईच्या तृतीय मानांकित यू पेईशी होणार आहे. भारताच्या अनुपमा उपाध्याय आणि मालविका बनसूद यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या पुत्री वेरदानीने अनुपमा उपाध्यायचा 21-11, 21-18 तसेच इंडोनेशियाच्या 8 व्या मानांकित इस्टेर वेर्दोने मालविका बनसूदचा 21-17, 23-21 असा पराभव केला.