शिवारात पेरणी करायची कशी? बळीराजाची चिंता वाढली
शेतशिवारांमध्ये पाणी साचल्यामुळे ओलावा मोठ्या प्रमाणात : पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली
वार्ताहर/किणये
तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हा पाऊस इतका जोरदार झाला आहे की शेतशिवारांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे शिवारात अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाला असून पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. खरीप हंगाम साधायचा कसा, भातपेरणी करायची कशी? याची चिंता बळीराजाला लागून राहिली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी दुपारी थोड्या प्रमाणात विश्रांती घेतली होती. मात्र मंगळवारी सकाळी व सायंकाळी पाऊस सुरूच होता. तसेच आठ दिवस मुसळधार पाऊस झाला असल्यामुळे शिवारात पाणी साचले आहे. यामुळे यंदातरी खरीप हंगामातील पेरणी ठप्प झाली आहे. तालुक्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. बहुतांशी लोक शेतशिवारात खरीप हंगामात विविध प्रकारची पिके घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असतात. खरीप हंगाम हा बळीराजासाठी महत्त्वाचा आहे. या खरीप हंगामात प्रामुख्याने भातपीक घेण्यात येते.
याचबरोबर भुईमूग, बटाटा, रताळी, नाचणी आदी पिके प्रामुख्याने घेण्यात येतात. या पिकांच्या पेरणीसाठी व लागवडीसाठी शेतकऱ्यांनी आपापल्या शिवारांमध्ये नियोजन केले आहे. शेणखत आणून टाकलेले आहे. गेल्या महिन्याभरात वळीव पावसानेही दमदार हजेरी लावली होती. यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात केली. तसेच मे 20 नंतर धूळवाफ पेरणी करण्यात येते. मात्र या कालावधीतच मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला असल्याने धूळवाफ पेरणी पूर्णपणे ठप्प झालेली आहे. पाणथळ शिवारांमध्ये भातरोप लागवड करण्यात येते. या भातरोप लागवडीसाठीही रोपांकरिता भाताची पेरणी करण्यात येते. मात्र जमिनीत अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाला असल्यामुळे रोप लागवडीसाठी भातपेरणी करण्यात आलेली नाही. शिवारात भाताची पेरणी नाही. यंदा खरीप हंगाम साधायचा तरी कसा? याची चिंता सध्या शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे. खरीप हंगामातील विविध पिकांसाठी शेतकऱ्यांनी यापूर्वीच बैलगाडी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने शिवारात शेणखत आणून टाकलेले आहे. भुईमूग, भात आदी बियाणांची खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे यंदाचे गणित कोलमडले आहे.
निसर्गाचे चक्र बदलले
पूर्वी उन्हाळ्यामध्ये दोन-तीनवेळा वळिवाचा पाऊस होत असे. यानंतर पेरणीपूर्व मशागतीची कामे आम्ही जोमाने करत होतो. त्यानंतर जून महिन्याच्या सात ते आठ तारखेपासून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला की मान्सूनला सुरुवात होत असे. यापूर्वीच धूळवाफ पेरणी करण्यात येत होती. तसेच मान्सूनला प्रारंभ झाल्यानंतर नांगराने भातपेरणी व इतर बियाण्यांची पेरणी व लागवड करण्यात येत असे. असे हे समीकरण ठरलेले होते. अलीकडे मात्र हवामानात कमालीचा बदल झाला आहे. निसर्गाचे चक्र बदलले आहे. मान्सूनला सुरुवात होण्याआधीच मान्सूनपूर्व पाऊस इतका जोरदार झाला की, शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे भातपेरणीची व इतर सर्व कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. पावसाने सध्यातरी उघडीप देण्याची गरज आहे. तरच खरीप हंगाम साधता येणार आहे.
- नामदेव गुरव, शेतकरी बेळगुंदी
