प्राध्यापक भरती कशी करायची...
मुलाखतीनंतर एक दिवसात जागा जाहीर करणे कठीणः विद्यापीठांसह महाविद्यालयांसमोर मोठा प्रश्न
कोल्हापूरः अहिल्या परकाळे
राज्यपालांनी अकृषी विद्यापीठातील प्राध्यापक भरती बंदी उठवली आहे. परंतू अद्यादेशात मुलाखतीनंतर तत्काळ नियुक्ती केलेल्या प्राध्यापकांची नावे जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुर्वी विषयवार रोस्टर होते. पण आता विद्यापीठातील एकूण जागा आणि प्रवर्गनिहाय टक्केवारीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण पेली जाणार आहे. त्यामुळे एका दिवसात मुलाखती पूर्ण करून रोस्टरवाईज भरतीप्रक्रिया जाहीर करणे कठीण आहे. त्यामुळे मुलाखत झाल्यानंतर कोणत्या प्रवर्गातील प्राध्यापकाची नियुक्ती केली, हे कसे जाहीर करायचे असा प्रश्न असल्याने आणखी काही कालावधी द्यावा अशी शिक्षण वर्तुळातून मागणी होत आहे.
राज्यभरातील विद्यापीठ असो अथवा महाविद्यालयातील भरती प्रक्रिया नवीन नियमानुसार हायस्कूलप्रमाणे रोस्टर तपासणी करून राबविण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ७२ पदांची भरती केली जाणार आहे. ही पदभरती करताना किमान एका विषयाला आठ ते दहा उमेदवार गृहित धरले तरी एकूण विषयाच्या ५७६ ते ७२० उमेदवारांच्या मुलाखती एका दिवसात कशा पूर्ण करायच्या ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान सर्व प्रक्रियेचे अॅडीओ आणि व्हिडीओ चित्रिकरणही करणे बंधनकारक आहे. त्यामुळे एका दिवसात सर्व मुलाखती पूर्ण करून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रोस्टरप्रमाणे कोणाची निवड केली हे जाहीर करणे कठीण आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला 80 टक्के गुण तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण देण्यात येणार आहेत. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. परंतू एकापेक्षा अनेकांना 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर त्यांचे मूल्यमापन करणे आणि रोस्टरनुसार निवड करून ते त्वरीत जाहीर करणे अशक्य होणार आहे. नवीन नियमानुसार विषयवार आरक्षण नसून एकूण जागेनुसार आरक्षण जाहीर केले आहे. यामध्ये जागांपैकीपैकी एसटीला ६० टक्के, एससीला 13 टक्के एससीबीसीला १० टक्के व ओपनला त्यांच्या कोट्याप्रमाणे आरक्षण दिले जाणार आहे. निवड समितीमधील राज्यपाल सदस्य, व्यवस्थापन सदस्य, कुलगुरू, दोन विषय तज्ञ याच्या प्रत्येकांच्या गुणांकानुसार दोन दिवस निवड जाहीर करण्यास लागतील अशी चर्चा शिक्षण वर्तुळात आहे.
काहींना पुन्हा एकदा रोस्टर तपासणी करावी लागेल
महाविद्यालय किंवा अधिविभागातील जागांच्या भरतीची जाहीराती प्रसिध्द झाली आहे, त्यांची रोस्टर तपासणी पूर्ण झाली आहे. परंतू ज्या अधिविभागातील किंवा कॉलेजमधील विषयाच्या रिक्त जागांना भरतीची परवानगी मिळाली आहे, त्यांना पुन्हा एकदा रोस्टर तपासणी करावी लागेल. रोस्टर तपासणीत संस्थेच्या स्थापनेपासून संबंधीत विषयाला कोणत्या प्रवर्गातील किती जागा भरल्या किती रिक्त याची तपासणी करावी लागते.
अशी असते रोस्टर तपासणी
महाविद्यालय किंवा अधिविभागांना विद्यापीठातून रोस्टर तपासणी करून ते पुणे येथील, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून अंतिम मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर विषय निहाय जागा भरण्याची जाहिरात प्रसिध्द करावी लागते.
एका दिवसात भरलेल्या जागा जाहीर करणे अडचणीचे
लोकांच्या दबावामुळे योग्य उमेदवाराची निवड व्हावी म्हणून नियमात बदल केले असून हे नियम स्वागतार्ह आहेत. राज्यभरातील विद्यापीठनिहाय रोस्टर तपासणी एकूण जागेनुसार झाली आहे. हायस्कूलप्रमाणे विद्यापीठ किंवा महाविद्यालय पातळीवरील जागा भरल्या जाणार आहेत. परंतू एक दिवसात भरलेल्या जागा जाहीर करणे अडचणीचे होईल.
डॉ. क्रांतिकुमार पाटील (कार्यकारी अध्यक्ष, ताराराणी विद्यापीठ)
निवड प्रक्रिया गुंतागुंतीची
निवड प्रक्रियेत गुंतागुंत आहे. आरक्षण पध्दतीत बदल केले आहेत. त्यामुसार निवड प्रक्रिया पूर्ण करून एक दिवसात निवड जाहीर करणे कठीण आहे. तरीही शिक्षण संस्था आपआपल्या पातळीवर निवड प्रक्रियेची तयारी करीत आहेत.
प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य, शिवाजी विद्यापीठ)