For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जेवण शिजवायचे तरी कसे?

11:13 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
जेवण शिजवायचे तरी कसे
Advertisement

फोंडा तालुक्यात गृहिणींचा सवाल : फोंड्यात एलपीजी पुरवठा ठप्प,तालुक्यातील ग्राहकांचे प्रचंड हाल,बुकिंग कऊनही मिळेनात सिलिंडर,फोंड्यात 17 हजार कार्डधारक

Advertisement

फोंडा : गोवा मार्केटिंग फेडरेशनतर्फे फोंडा तालुक्यात पुरवठा होत असलेली भारत गॅसची घरगुती सिलिंडर सेवा गेल्या पाच दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली असून या कृत्रिम टंचाईमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. स्वयंपाक गॅस (एलपीजी) मिळविण्यासाठी फोंडा शहर व तालुक्याच्या अन्य भागातील नागरिकांची फेडरेशनच्या फोंडा कार्यालयात झुंबड उडत आहे. गॅस सिलिंडरची घरपोच सेवा गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. तसेच सिलिंडरचा साठाही संपल्याने गोदाम खाली पडले आहेत. या अवघड परिस्थितीत गृहिणींवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे. जानेवारीपासून घरगुती सिलिंडर बुकिंगसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. भारत गॅसचे फोंड्यातील मुख्य पुरवठादार असलेल्या गोवा मार्केटिंग फेडरेशनने दोन महिन्यांचा ऑनलाईन बुकिंग केलेला बॅकलॉग पूर्ण न केल्याने त्यांचा सिलिंडर साठाच बंद करण्यात आला आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागत आहे. मार्केटिंग फेडरेशन हे फोंडा तालुक्यातील भारत गॅस सिलिंडरचे सर्वांत मोठे पुरवठादार आहेत. फोंडा शहरासह, बोरी, दुर्भाट, तळावली, आगापूर, बांदोडा, मडकई, म्हार्दोळ, प्रियोळ व अन्य आसपासच्या भागात मिळून त्यांचे साधारण सतरा हजार कार्डधारक आहेत. यापैकी ज्यांचे सिलिंडर संपलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे एकच सिलिंडर आहे, अशा ग्राहकांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत. घरातील सिलिंडर संपल्याने गृहिणींवर तर अक्षरश: रडण्याची वेळ आली आहे.

घरपोच सेवा बंद, कार्यालयाकडे धाव

Advertisement

मागील आठवड्यापासून घरपोच सेवा देणारी सर्व मार्गांवरील फेडरेशनची वाहने बंद आहेत. आठवडाभर वाहनांची प्रतीक्षा केल्यानंतर ग्राहकांनी सिलिंडरसाठी फोंडा येथील कार्यालयाकडे धाव घ्यायला सुऊवात केली आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या खंडित सेवेने वेठीस धरले आहे. चारवेळा ऑनलाईन बुकिंग कऊनही सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांची सहनशिलता संपली आहे.

कार्यालयातील फलक संतापजनक

सोमवारी अशाच काही संतप्त ग्राहकांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी जोरदार हुज्जत घातल्याने प्रकरण हातघाईवर आले. अखेर पोलिसांना बोलावून मध्यस्थी करावी लागली. मंगळवारच्या दिवशी तर गॅस बुकिंगच्या कार्यालयावर स्टॉक संपल्याचा फलक पाहून ग्राहक अधिकच भडकले. गॅस सिलिंडर केव्हा उपलब्ध होतील, याची हमी देणारा एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने ग्राहकांना तोंड देताना कर्मचाऱ्यांची गोची झाली आहे. दैनंदिन जीवनातील अनिवार्य घटक असलेल्या रसोईच्या गॅस तुटवड्यामुळे फोंड्यातील ग्राहक हैराण झाले असून त्यांना आपली सर्व कामे सोडून सिलिंडरसाठी दिवसभर हेलपाटे मारावे लागत आहेत. कधी नव्हे ती सिलिंडर तुटवड्याची बिकट परिस्थिती पहिल्यांदाच फोंड्यातील ग्राहकांवर ओढवली आहे. फोंडा शहरात भूमिगत वाहिन्यांतून थेट गॅसपुरवठा सेवा सुऊ झाली तरी, बऱ्याच घरांना व रहिवासी प्रकल्पांना अद्याप जोडण्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात नागरिक अजूनही सिलिंडरवर अवलंबून आहेत. बांदोड्यातून आलेल्या एका गृहिणीने आपला संताप व्यक्त करताना चारवेळा ऑनलाईन बुकिंग कऊनही सिलिंडर मिळत नसल्याचे सांगून घरात जेवण बनवण्यासाठी चुलीचीही सोय नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. फोंडा शहर व आसपासच्या भागात फ्लॅटमध्ये राहणाऱ्या गृहिणींना कुटुंबासाठी सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण कसे बनवावे, या चिंतेने घेरले आहे.

तुटवड्याला संचालक मंडळ जबाबदार

गॅस तुटवड्याच्या या परिस्थितीला पूर्णत: मार्केटिंग फेडरेशनचे संचालक मंडळ जबाबदार असल्याचा आरोप माजी अध्यक्ष राजू नाईक यांनी केला आहे. फेडरेशनवरील विद्यमान संचालक मंडळ अत्यंत निष्क्रिय व बेजबाबदार असून त्यांना ही परिस्थिती हाताळता न आल्यानेच फोंडा तालुक्यात कधी नव्हे तो गॅस तुडवडा निर्माण झालेला आहे. आजच्या काळात प्रत्येक घरात गॅस सिलिंडरशिवाय चुलच पेटत नाही. ही परिस्थिती हाताळण्यापेक्षा कर्मचाऱ्यांना लोकांच्या तोंडी देऊन अध्यक्षांसह सर्व संचालक आपले फोन बंद ठेऊन बसले आहेत. संचालक मंडळाच्या या हलगर्जीपणामुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

...तर रिकाम्या सिलिंडरसह रस्त्यावर उतऊ

मार्केटिंग फेडरेशनच्या दोन ट्रकमधून दर दिवशी प्रत्येकी चारशे याप्रमाणे साधारण आठशे सिलिंडर फोंड्यातील गोदामात येतात. गेल्या दोन दिवसांपासून वेर्णा येथील भारत गॅसच्या पुरवठा केंद्रावर जाणारे हे ट्रक सिलिंडरविनाच फोंड्यात परत येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष घालावे. येत्या दोन दिवसांत पुरवठा सुरळीत न झाल्यास रिकाम्या सिलिंडरसह रस्त्यावर उतरण्याचा इशाराही काही ग्राहकांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.