वडापाव-समोशात किती तेल? लाडू-जिलेबीत किती साखर?
कॅन्टीनमध्ये अन्नपदार्थांमधील कॅलरीज दर्शविणारे फलक लावण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तुम्ही खाण्यासाठी इच्छुक असलेल्या समोशात किती तेल आहे, लाडू- जिलेबीमध्ये साखरेचे प्रमाण किती आहे आणि भजी-वडापावमध्ये किती कॅलरीज आहेत, ही माहिती आता विविध कॅन्टीनमध्ये स्नॅक्ससोबत ग्राहकांना मिळणार आहे. भारतात वेगाने वाढत असलेले लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग रोखण्यासाठी सरकारने आता अन्नपदार्थांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नवीन निर्देश जारी करताना सर्व मंत्रालये, विभाग आणि स्वायत्त संस्थांना त्यांच्या संबंधित कॅम्पसच्या कॅन्टीनमध्ये ‘तेल आणि साखरेचे इशारा देणारे फलक’ लावण्यास सांगितले आहे.
विविध कॅन्टीनमध्ये आता समोसा, जिलेबी, भजी, लाडू, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज यासारख्या लोकप्रिय परंतु हानिकारक अन्नपदार्थांमध्ये असलेल्या कॅलरीज आणि साखरेच्या प्रमाणाची माहिती या फलकांवर दिली जाईल. आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारच्या सर्व विभागांना त्यांच्या कॅन्टीनमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी ‘तेल आणि साखर’ असे इशारा फलक लावण्यास सांगितले आहे. देशातील वाढत्या आरोग्यविषयक समस्या कमी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार साखर आणि कॅलरीजविषयीची माहिती फलकावर नमूद केली असली तरी त्यांच्यावर बंदी घातली जाणार नाही. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये, विभाग आणि स्वायत्त संस्थांच्या कॅन्टीनमध्ये हा नियम लागू असेल.
नवीन आदेशानुसार, प्रत्येक संस्थेच्या आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कॅन्टीनमध्ये इशारेवजा फलक लावले जातील. याचा उद्देश आपण खात असलेल्या अन्नपदार्थांचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे सांगणे आहे. सर्वसाधारणपणे या आदेशाची स्थिती यापूर्वी सिगारेटच्या पाकिटांवर छापलेल्या इशाऱ्यांसारखी असेल. त्याचा उद्देश लोकांना हानिकारक सवयींबद्दल जागरूक करणे आहे. सध्या अन्नपदार्थांसंबंधीचे फलक केवळ कॅन्टीन किंवा सार्वजनिक ठिकाणी पोस्टर आणि बोर्डच्या स्वरूपात लावले जातील. मात्र, सरकार हळूहळू ते मोठ्या प्रमाणावर सर्वत्रच अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
उपक्रमाची आवश्यकता
आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात लठ्ठपणा आणि संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार, शहरी भागातील प्रत्येक पाचवा प्रौढ व्यक्ती लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रस्त आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘लॅन्सेट जीबीडी 2021 ओबेसिटी फोरकास्ट स्टडी’नुसार, 2021 मध्ये भारतात 18 कोटी लठ्ठ किंवा जास्त वजन असलेले लोक होते. हा आकडा 2050 पर्यंत 44.9 कोटीपर्यंत वाढू शकतो. ही परिस्थिती भारताला जगात लठ्ठ लोकांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आणू शकते. त्यामुळेच आरोग्यविषयक समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून चालवला जात आहे.
अंमलबजावणीचे निर्देश
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सर्व सरकारी कार्यालयांना ही मोहीम गांभीर्याने घेण्याचे आणि आपल्या परिसरात ती अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाने माहितीफलक लावण्यासोबतच कामाच्या ठिकाणी पौष्टिक आणि कमी चरबीयुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे, पायऱ्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे, जेवणाच्या वेळी हलके व्यायाम करणे आणि चालणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे.