नेलपॉलिशची किंमत किती ?
लिपस्टिक, नेलपॉलिश आदी वस्तूंचा परिचय सर्वांना आहे. अलिकडच्या काळात महिला त्यांच्या व्यक्तीमत्वासंबंधी सजग झाल्यामुळे त्यांचे सौंदर्य खुलविणारी ही साधने अगदी खेडोपाड्यांमध्येसुद्धा उपयोगात आणली जात आहेत. बहुतेकवेळा या वस्तूंची किंमत सर्वसामान्यांना परवडण्यासारखी असते. त्यामुळे त्यांची खरेदी नेहमी केली जाते. तथापि, ब्रिटनची राजधानी लंडन येथे एक नेलपॉलिश असे आहे की ज्याची किंमत ही सर्वसामान्यांचे सोडाच, पण श्रीमंतांचेही डोळे पांढरे करु शकेल अशी आहे. ही किंमत आहे चक्क 2 कोटी 10 लाख 15 हजार रुपये.
केवळ आपली नखे रंगविण्यासाठी एवढी किंमत कोण देत असेल, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. शिवाय एवढे या नेलपॉलिशमध्ये आहे तरी काय, हा प्रश्नही महत्वाचाच आहे. कारण, आपण जेव्हा अशा वस्तू 20 रुपयांपासून जास्तीत जास्त 2 हजार रुपयांपर्यंत किंमत देतो. मात्र, हे 2 कोटीचे नेलपॉलिश तसे विशेषच आहे. त्याशिवाय एवढी किंमत कोणी देणे शक्य नाही.
या नेलपॉलिशमध्ये 267 कॅरटच्या काळ्या हिऱ्यांचे चूर्णाचे मिश्रण केलेले असते. शिवाय हे नेलपॉलिश संपल्यानंतर त्याची बाटली टाकायची नसते. कारण ती बाटलीचे झाकणही प्लॅटिनम या सोन्यापेक्षाही महाग धातूंचे असून त्याच्यावर हिरे जडवलेले असतात. आता अशा बाटलीत जे नेलपॉलिश मिळते त्याची किंमत कोट्यावधी रुपये असणार, यात आश्चर्य ते काय ? हे नेलपॉलिश जगातील ख्यातनाम चित्रपट अभिनेत्री आणि धनवान महिलाच खरेदी करु शकतात, हे निश्चित. या ब्रँडचे नाव ‘एजेचर’ असे असल्याची माहिती मिळते.