महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटनातील निष्काळजीपणाचे आणखी किती बळी?

06:03 AM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यटनाचा आनंद घ्यायलाच हवा. परंतु स्वत:च्या जीवापेक्षा पर्यटनाचा आनंद किमती नाही, हे प्रत्येकाने जाणले तर देवगड समुद्रकिनारी अलीकडेच घडलेली दुर्घटना (पुण्याहून सहलीसाठी आलेल्या पाचजणांचा समुद्रात बुडून झालेला मृत्यू) टाळता आली असती. शैक्षणिक सहलीसाठी शासनाने नियमावली घालून दिलेली आहे. पण या नियमावलीचे पालन केले जात नाही किंवा पर्यटनाच्या मोहाला आवरही घातला जात नाही. त्यामुळे देवगडसारख्या दुर्घटनेमधून निष्काळजीपणाचे आणखी कितीजणांचे बळी जाणार, असा प्रश्न पडतो. दोष तरी कुणाकुणाला द्यायचा हाही प्रश्न पडतो. त्यामुळे आगामी काळात तरी समुद्रात बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी शासन व प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.

Advertisement

पिंपरी-चिंचवड पुणे येथील सैनिक अॅकेडमीच्या 35 विद्यार्थ्यांची सहल सिंधुदुर्गमध्ये गेल्या आठवड्यात आली होती. सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी कोकण किनाऱ्यावरील मालवण, कुणकेश्वर, देवगड पवनचक्की येथील पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर देवगड समुद्र किनारी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांमधून 6 विद्यार्थी बुडाले. त्यातील एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले. तर पाच विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. पायल बनसोडे, अनिशा पवळे, प्रेरणा डोंगरे, अंकिता गलाटे या पुणे येथील 18 ते 22 वर्षे वयोगटातील चार युवती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असलेला रामचंद्र डिचोलकर या युवकाचा यात समावेश होता.

Advertisement

पर्यटनासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी हे विद्यार्थी जसजसे पाण्यात आत जाऊ लागले, तसतशी त्यांच्या पायाखालील वाळू सरकू लागली. समुद्राच्या पाण्याचा या विद्यार्थ्यांना अंदाज न आल्याने हे विद्यार्थी समुद्रात बुडाले. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेत शोक व्यक्त केला. मात्र या दुर्घटनेनंतर समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना थांबणार का, पर्यटकांचा निष्काळजीपणा किंवा समुद्र किनारी सुरक्षा नसल्याने होणाऱ्या दुर्घटना थांबविण्यासाठी कुणी ठोस उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलणार का, असा प्रश्न पडतो.

कोकणातील स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असतात. सिंधुदुर्ग तर पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातून व परराज्यातून पर्यटक येत असतात. समुद्रकिनारी येणाऱ्या काही पर्यटकांनी तर कधी तत्पूर्वी समुद्रही पाहिलेला नसतो. अशा पर्यटकांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरता येत नाही आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना आतापर्यंत अनेक घडल्या आहेत. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना सावधानता बाळगली पाहिजे. आपली छोटीशी चूक आपल्या जीवावर बेतू शकते, हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. सूचना व नियमांचे पालन केले पाहिजे. शासन व प्रशासनाकडून समुद्र किनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

कोकणातील समुद्र किनारा अतिशय स्वच्छ व मनमोहक असल्याने लाखो पर्यटक दरवर्षी कोकण किनारपट्टीवर येत असतात. या पर्यटकांना खोल समुद्रात जाऊ नका, अशा सूचना केल्या जातात. परंतु बरेच पर्यटक सूचनांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे निदान गर्दी होणाऱ्या महत्त्वाच्या बीचवर कायमस्वरुपी जीवरक्षक तैनात असणे आवश्यक आहे. जीवरक्षकांमुळे बुडणाऱ्या पर्यटकांचा जीव वाचवता येईल. समुद्र किनारी सूचनांचे आवाहन करणारे फलक आणि अनौन्सिंगची सुविधा असायला हवी. उंचावरून टेहळणीसाठी टॉवर, सायंकाळी काळोख पडू लागताच पर्यटकांना किनाऱ्यापासून दूर जाण्यासाठी आवाहन करणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्यात जाणाऱ्यांना लाईफ जॅकेट घालणे सक्तीचे करायला हवे. समुद्र किनारी असलेल्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जीवरक्षक नेमायला हवेत. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून जीवरक्षकांच्या मानधनाची तरतूद करायला हवी.

काही समुद्रकिनारी सूचनांचे फलक लावलेले आहेत की, इथे समुद्र खोल आहे. पोहण्यासाठी जाऊ नये. मात्र फलक पाहूनही दुर्लक्ष करण्याची सवय पर्यटकांना झाली आहे. इथे कचरा टाकू नये, स्वच्छता राखावी, धुम्रपानास मनाई आहे. अशा सूचना किंवा फलक लावले जातात. परंतु नेमका त्याचठिकाणी कचरा टाकलेला दिसतो. स्वच्छता राखली जात नाही. त्यामुळे नियमांचे पालन करायचेच नाही, अशी अत्यंत वाईट सवय अनेकांना असते. हीच वाईट सवय केव्हातरी जीवावर बेतते, तेव्हा जाग येते. तोपर्यंत वेळ मात्र निघून गेलेली असते. त्यामुळे समुद्र किनारी होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी.

35 विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांचा देवगडला समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर या दुर्घटनेस जबाबदार धरून सैनिक अॅकेडमीचे संचालक नितीन माने व बस चालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होण्याची ही कारवाई योग्य असली, तरी घटना घडल्यावर जाग येण्यापेक्षा शासनाने सहलीसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे. सहल नेताना पालकांना कोणतीच कल्पना दिली गेली नाही, अशी पालकांनी तक्रार केली आहे. सहलीसाठी वाहन परवाना घेणे आवश्यक असतो, तो घेतलेला नव्हता. या बाबी दुर्घटनेनंतर पुढे आल्या आहेत. त्यामुळे पुणे येथून कोकणात 35 विद्यार्थ्यांची सहल आणत असताना किती निष्काळजीपणा केला गेला, हे स्पष्ट होते.

सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने काही नियमावली ठरवून दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने समुद्र किनारे, अतिजोखमीची पर्वतांवरील ठिकाणे, नदी, तलाव, विहिरी, उंच टेकड्या आदी ठिकाणी शैक्षणिक सहली काढू नयेत, असे स्पष्ट म्हटलेले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली नेण्यापूर्वी प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. सहलीबरोबर प्रथमोपचार पेटी, सहल जाणार तेथील डॉक्टरांचे संपर्क नंबर, पालकांना सहलीची कल्पना देऊन गरज असल्यास पालकांचा प्रतिनिधी सोबत घेणे, सहलीसाठी एसटी बस किंवा आरटीओने मान्यता दिलेल्याच बस वापरणे, असे अनेक नियम सहलीसाठी घालून दिलेले आहेत. परंतु या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत नाही.

कोकणामध्ये रत्नागिरीतील गणपतीपुळे, सिंधुदुर्गातील देवगड, कुणकेश्वर, तारकर्ली, शिरोडा वेळागर हे महत्त्वाचे समुद्र किनारे असून या ठिकाणी अनेकवेळा पर्यटक समुद्रात बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीदेखील ठोस उपाययोजना आखलेल्या नाहीत. पर्यटकांना समुद्रात जाण्याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे निष्काळजीपणाचे आणखी किती बळी जाणार, असा प्रश्न पडतो. त्याकरिता शासन व प्रशासनाने सहलीला जाणाऱ्या-येणाऱ्यांसाठी काटेकोर नियमांच्या अंमलबजावणीबरोबरच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक नेमणे यासारख्या ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article