For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रशासनाला आणखी किती बळी हवेत?

10:34 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रशासनाला आणखी किती बळी हवेत
Advertisement

खानापूर तालुक्यातील सर्व रस्त्यांची चाळण : रस्ते बनले मृत्यूचे सापळे : प्रशासनाचे रस्ते दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष

Advertisement

खानापूर : तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून रस्त्यांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. हे रस्ते माणसांच्या मृत्यूचे सापळे बनले आहेत. मात्र अधिकारी आणि प्रशासन ढीम्म बनले आहे. साधी डागडुजी करण्याचीही तसदी घेत नसल्याने या रस्त्यावर अपघातांच्या मालिकाच सुरू आहेत. अलीकडे दुचाकीस्वारांचे खड्ड्यांमुळे अपघात होत असून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत रस्त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून दोन दिवसापूर्वीच हलशी-मेरडा रस्त्यावर झालेल्या अपघातात संतोष मादार या तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाला आणि किती बळी गेल्यानंतर तालुक्यातील रस्त्याच्या डागडुजीबाबत डोळे उघडणार आहेत, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा पंचायतीचे संपर्क रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वेळोवेळी मागणी करूनदेखील जिल्हा पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिकाच सुरू असून छोटेमोठे अपघात गेल्या तीन महिन्यापासून सतत घडत आहेत.. मात्र जिल्हा पंचायत आणि बांधकाम खात्याकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसून येत आहे. हलशी-हलगा या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. एका नामांकित कंत्राटदाराला या रस्त्याचे कामही देण्यात आले होते. कंत्राटदाराने अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रुंदीकरणासाठी दोन कि. मी.ची चर मारली आहे. आणि यानंतर कंत्राटदाराने काम सोडून पलायन केले आहे.

Advertisement

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे संतोष मादार यांचा बळी

या रस्त्यांबाबत ‘तरुण भारत’ने देखील वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने या कंत्राटदाराबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर मारल्याने तसेच मूळ रस्ता उखडून गेल्याने जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही या रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही सूचना केली नसल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच या रस्त्यावर संतोष मादार याचा बळी गेला आहे. यानंतर तरी प्रशासन या रस्त्याच्या डागडुजीसाठी क्रम घेईल का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

प्रशासन निद्रिस्त अवस्थेत

तालुक्यातील मुख्य रस्ता असलेला रुमेवाडी क्रॉस ते हेम्माडगापर्यंतचा रस्ताही वाहतुकीसाठी योग्य नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावरही जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्याचीही पूर्णपणे चाळण झाली आहे. रुमेवाडी क्रॉस ते हेम्माडगा रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास 40 गावे आहेत. हा रस्ता गोवा राज्याला जोडला असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र या रस्त्याकडेही गेल्या काही वर्षापासून साफ दुर्लक्ष झाले आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत असून प्रशासन निद्रिस्त अवस्थेत असल्यामुळे या भागातील नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

खानापूर-जांबोटी रस्ताही पूर्णपणे उद्ध्वस्त 

खानापूर-जांबोटी रस्ताही पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच होत असलेल्या जोरदार पावसामुळे खड्ड्यांची व्याप्ती वाढली आहे. तसेच कुसमळी रस्त्यावरुन अवजड वाहतूक बंद केल्याने या रस्त्यावरुन गोव्यासाठी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काही दिवसानंतर अस्तित्वच नष्ट होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना रस्त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तालुक्याच्या पूर्वभागातील इटगी, गंदिगवाड, पारिश्वाड, बिडी, बेकवाड या परिसरातील गावांचे संपर्क रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. नुकतेच इटगी, पारिश्वाड येथील नागरिकांनी जि. पं. अधिकाऱ्यांना भेटून रस्ता दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

आमदारांनी तातडीने बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना करावी

गणेश चतुर्थी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने उद्योग व्यवसायासाठी तालुक्याबाहेर असलेले चाकरमानी गणेश चतुर्थी सणासाठी मोठ्या प्रमाणात गावाकडे येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जिल्हा पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन रस्त्यांच्या तात्पुरती दुरुस्तीबाबत सूचना करणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.