क्रशर चौक ते पुईखडी मार्ग आणखी किती बळी घेणार..?
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
राधानगरी, सिंधुदूर्ग, मालवण, कोकणसह गोवा राज्य मार्गाला जोडणाऱ्या क्रशर चौक, आपटेनगर चौक ते पुईखडी मार्ग असुविधेच्या गर्तेत सापडला आहे. मागील दोन वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातात एका चिमुरडीसह नागरिकाला जीव गमवावा लागला आहे. तर वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे अनेकजण जखमी झाले आहे. अद्यापही अपघातांची मालिका सुरूच असुन राज्य मार्गाचा दर्जा असणाऱ्या क्रशर चौक ते पुईखडी मार्गावरील रस्त्याला सुविधा कधी मिळणार? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
या मार्गावर मनपा प्रशासनाकडून जागोजागी पाणी गळतीसह विविध कामांसाठी केलेल्या प्रचंड खोदाईमुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे. खोदाई केलेल्या ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे सपाटीकरण व डांबरीकरण केले जात नाही. आहे तीच खडी व माती टाकून खड्डे मुजविले जातात. कालांतराने खडी व माती वर येऊन रस्त्यावर पसरत आहे. यावरून दुचाकी स्लीप होत आहेत. क्रशर चौक व आपटेनगर चौकात असलेल्या सिग्नलवरच खड्डे असल्याने सिग्नल पार करताना वाहतुकदारांना कसरत करावी लागत आहे.
मार्गावर ठिकठिकाणी पाणी गळतीमुळे खड्डे वाढत आहेत. नियमबाह्य व फुटलेले गतिरोधक आपघातास निमंत्रण देत आहेत. सानेगुरूजी वसाहत येथील मुख्य मार्गावरून भाजी मार्केटकडे जाणाऱ्या एका वळणावर दोन वर्षापूर्वी डिव्हाडरला धडकून झालेल्या अपघातात एका नागरिकाला जीव गमावावा लागला. यानंतरही अपघातांची मालिका सुरूच आहे. याकडे प्रशासन गांभिर्याने कधी पाहणार, आणखी किती बळी घेणार असे अनेक प्रश्न नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत.
- वाहतुकीचा भार वाढतोय
या मार्गावरून सानेगुरूजी वसाहत, राजोपाध्येनगर, जीवबानाना पार्क, साळोखेनगर, फुलेवाडी, आपटेनगर, बोंद्रनगर, कनेरकरनगर आदी उपनगरांची वाहतुक सुरू असते. आता उपनगरांचा विस्तार झपाट्याने होत आहे. नागरी वस्तीही वाढली असुन दुचाकी, चारचाकी वाहनेही दुपटीने वाढली आहेत. केएमटीसह अवजड वाहतुकीची नेहमी वर्दळ या मार्गावरून सुरू असते. त्याप्रमाणात सुविधा अपुऱ्या पडत आहेत.
- तरीही प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी :
राजोपाध्येनगर येथील प्रतिराज बंगला येथे दोन वर्षापुर्वी गतिरोधकावरून महिलेचा तोल गेल्याने दुचाकी घसरली. दुचाकीवर बसलेली चिमुकली पाठीमागुन येणाऱ्या केएमटीच्या मागील चाकात सापडल्याने जागीच मृत्यू पावली. ही घटना होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही याठिकाणी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. प्रशासन आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- डांबरीकरणाचे रस्ते दबले
आयआरबीने केलेले सिमेंट काँक्रीट व डांबरीकरणाच्या रस्त्यांमध्ये अंतर पडले आहे. डांबरीकरणाचे रस्ते दबल्यामुळे सिमेंटच्या रस्त्यावर अर्धा फुटाचा काट तयार झाला आहे. तसेच दोन्ही रस्त्यावर फट पडत आहे. यावरून दुचाकी घसरून रोज अपघात होत आहेत. यामध्ये महिलांचे अपघताचे प्रमाण वाढले आहे.
- एकूण आठ चौक
क्रशर चौक ते पुईखडी दरम्यान एकूण आठ चौक लागतात. प्रत्येक चौकात खड्डे, अतिक्रमण, नियमबाह्य गतिरोधक, खोदाई, पाणी गळती आदी समस्या कायम आहेत. सानेगुरूजी वसाहत, राज्योपाध्येनगर व आपटेनगर येथील मुख्य चौकात वारंवार अपघात घडत आहेत.
- मुख्य मार्गाच्या दुतर्फा अतिक्रमण
क्रशर चौक ते आपटेनगर मार्गावर जागोजागी भाजीविक्रेते, व्यावसायिक, पान टपऱ्यांसह खाऊच्या गाड्यांचे अतिक्रमण वाढले आहे. रस्त्याच्या कडेलाच वाहने लावली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
- चौक बनले भाजी मार्केट
यामार्गावरील सानेगुरूजी वसाहत, आपटेनगर व क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकात भाजी विव्रेत्यांची संख्या वाढली आहे. प्रमुख चौकातील पदपथावर भाजी विक्रेते व्यवसायासाठी बसत आहेत. भाजी खरेदीसाठी नागरिक रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.
- मृत्यूची मालिका :
- 2021 : सानेगुरूजी वसाहत मुख्य चौकात दुचाकी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू
- 2022 : आपटेनगर चौकात दुचाकी-ट्रक अपघातात वृद्धा ठार
- 2023 : प्रतिराज बंगला येथे केएमटी-दुचाकी अपघातात 4 वर्षीय चिमुकली ठार
- गतिरोधकांवर पट्टे मारणे गरजचे
क्रशर चौक ते आपटेनगर मार्गावरील चौकाचौकात गतिरोधक आहेत. यातील बहुतांश गतिरोधक नियमबाह्या व अर्धवट फुटलेले आहेत. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहतुकदाराच्या लक्षात येत नसल्याने अपघात घडत आहेत. मुख्य रस्त्यावर खोदाई केलेल्या ठिकाणी खडी व माती तशीच पडून आहे. याठिकाणी डांबरीकरण करणे गरजेचे आहे. पाणी गळतीचा प्रश्न अजुनही सुटेलेला नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
सुशांत खाडे, नागरिक