किती मंत्री राज्याचा दौरा करतात?
सत्तधारी काँग्रेस आमदाराकडूनच सरकारला घरचा आहेर
बेळगाव : मंत्री केवळ आपले मतदारसंघ व बेंगळूरपुरते मर्यादित राहिले आहेत. काँग्रेस सरकारमधील अनेक मंत्र्यांनी खानापूर, निपाणी, बसवकल्याण, औराद, गुरमित्कलला भेट दिलेली नाही. राज्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर मंत्र्यांनी राज्याचा दौरा करावा, असा सल्ला काँग्रेसचे आमदार बी. आर. पाटील यांनी दिला. गेल्या अनेक वर्षांपासून आपण विधानसभेत आहोत. एस. आर. बोम्माई, नजीर अहमद आदी नेते संपूर्ण राज्याचा दौरा करायचे. त्यावेळी रस्तेही जेमतेम होते. उलट आता रस्त्यांचा दर्जा सुधारला आहे. तरीही अनेक मंत्री केवळ आपल्या मतदारसंघाचाच दौरा करतात किंवा बेंगळूरला होणाऱ्या बैठकीत सहभागी होतात.
सर्वांगीण विकासाचा त्यांनी ध्यास घेतला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.उत्तर कर्नाटकावरील चर्चेत भाग घेत हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी बी. आर. पाटील यांनी उत्तर कर्नाटक व कल्याण कर्नाटकातील विकासाचा आढावा घेतला. प्रत्येक क्षेत्रात कल्याण कर्नाटक मागास राहिलेला आहे. तफावत दूर करण्यासाठी सरकारने कल्याण कर्नाटकात त्वरित 300 आरोग्य केंद्रे सुरू करावीत. 371-जे कलम ही मल्लिकार्जुन खर्गे यांची कल्याण कर्नाटकाला दिलेली देणगी आहे. तरीही अनेक समस्या आहेत. या कलमाची समर्पकपणे अंमलबजावणी केली जात आहे की नाही, हे पाहण्यासाठी प्राधिकरण सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
371-जे या कलमाची अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या प्राधिकरणात राजकीय नेत्यांना थारा देऊ नये. उलट शिक्षणतज्ञ, निवृत्त न्यायाधीश, विद्यापीठांचे कुलगुरु आदींचा समावेश करावा. सचिवालयातही उत्तर कर्नाटकाचे कर्मचारी नाहीत. कल्याण कर्नाटकावरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी, असे सांगतानाच विद्यमान सरकारमधील मंत्री राज्याचा दौरा करीत नाहीत, असे परखड मत मांडले.
कल्याण कर्नाटकासाठी स्वतंत्र सचिवालय हवे
आपल्या एका मतदारसंघातील 15 ते 20 हजार कामगार पुण्यात काम करतात. मनरेगा योजनेनंतरही रोजगारासाठीचे स्थलांतर थांबलेले नाही. कल्याण कर्नाटकासाठी स्वतंत्र सचिवालयाची स्थापना करावी. ते कलबुर्गी येथे असावे. या परिसरातील पाणी योजना पूर्ण कराव्यात, आणि मंत्र्यांनी राज्याचा दौरा करावा, असा सल्ला बी. आर. पाटील यांनी दिला.
यादीत नावे असणारे मंत्रीच सभागृहात नाहीत!
सभाध्यक्ष यु. टी. खादर फरीद यांनी, आमदार बी. आर. पाटील यांना उत्तर कर्नाटकावर बोलण्यास सांगितले. त्यावेळी मध्येच हस्तक्षेप करीत विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी सभागृहात येत नाहीत. यादीमध्ये ज्या मंत्र्यांची नावे आहेत, ते सभागृहात येत नाहीत, असे सांगून याकडे सभाध्यक्षांचे लक्ष वेधले.