For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किती दिवस वेतन नसताना शहराची सफाई करू : कर्मचाऱ्यांचा सवाल

10:19 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
किती दिवस वेतन नसताना शहराची सफाई करू   कर्मचाऱ्यांचा सवाल
Advertisement

बेळगाव : भल्या पहाटे उठून शहर साफ करायचे मात्र गेल्या सात महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने ते अडचणीत आले आहेत. आम्हाला वेतन द्या या मागणीसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्तांना भेटून निवेदन दिले. सध्या सणांना सुरुवात झाली आहे. मात्र आपल्या घरात काहीच नाही त्यामुळे आम्ही सण साजरे करायचे की नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

महानगरपालिकेने अलीकडेच 155 कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले. सामावून घेताना त्यांच्याकडून विविध कागदपत्रे जमा करून घेतली. बेंगळूरच्या नगरविकास खात्याकडे ती पाठवून देण्यात आली. मात्र सात महिने उलटले तरी पगार नसल्याने हे कर्मचारी अडचणीत आले आहेत. ऊन, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता पहाटे काम करायचे. मात्र वेतन मिळत नाही या इतके दुर्दैव कोणते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अखेर या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी महानगरपालिकेला धडक दिली. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. यावेळी विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी हे उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन द्या, अशी मागणी केली. यावर मनपा आयुक्तांनी बेंगळूर येथूनच त्यांचे वेतन देण्याबाबत आदेश आला नाही. तसेच त्यांचे वेतन काही कारणास्तव थकले आहे. त्यामुळे मी नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करुन तातडीने वेतन देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.