घरी किती दारुच्या बाटल्या ठेवाव्यात?
उपमुख्यमंत्र्यांकडूनच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न
बेळगाव : घरी किती दारुच्या बाटल्या ठेवाव्यात? यासंबंधी एक निर्णय झाला पाहिजे. यासंबंधीचे नियम काय आहेत? याविषयी स्पष्टता मिळाली पाहिजे. अशी मागणी विधानसभेत स्वत: उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केली. बेकायदा दारुविक्री व व्यसनाधीनतेवर विधानसभेत जोरदार चर्चाही झाली. चिक्कनायकनहळ्ळीचे आमदार सुरेशबाबू सी. बी. यांनी आपल्या मतदारसंघातील किराणा दुकानात दारुविक्री केली जात आहे. त्यांच्यावर कारवाई का करीत नाही? असा तारांकित प्रश्न विचारला होता. अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी बेकायदा दारू थोपवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत, असे सभागृहात सांगितले.
या चर्चेत भाग घेत भाजपचे सुरेशकुमार यांनी किराणा दुकानात दारू विकत असतील तर सध्या स्विगी, झोमॅटो आदी सेवांमधूनही दारू पुरवठा करा, असे सांगत सरकारला टोमणा मारला. याबरोबरच अशा सेवा पुरविणाऱ्यांकडून अमलीपदार्थ पुरविले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अबकारी खात्याकडून दारुविक्रीचे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे, असा आरोप झाला. अबकारी मंत्र्यांनी आम्ही टार्गेट देत नाही. अमूक कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज वर्तवतो, असे सांगून सारवासारव केली. याचवेळी उपमुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात काही किराणा दुकानातून दारू विकली जाते, ही गोष्ट खरी आहे. एका व्यक्तीने आपल्या घरी किमान 7 बाटल्या ठेवाव्यात की आणखी किती? याविषयीही कायद्यात काय तरतूद आहे, याची स्पष्टता मिळाली पाहिजे, अशी मागणी केली.