असा कसा हा बेडूक ?
बेडूक हा प्राणी आपल्याला चांगलाच परिचयाचा आहे. पूर्वी याचे दर्शन अधिकवेळा घडत असे. आता दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने त्याचे शहरांमध्ये दर्शन दुर्मिळ झाले असले, तरी कोणत्याही पाणथळ जागेत किंवा जेथे चिखल साचलेला आहे आणि जवळपास वाहते पाणी आहे, तेथे त्याचे दर्शन होत असते. त्याच्या घशातून निघणारा टर्र टर्र असा आवाज तर अधिकच परिचित असतो.
तथापि, आफ्रिका खंडातील नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका देशांमध्ये एक विशेष प्रकारचा बेडूक अलिकडच्या काळात सापडला आहे. तो नेहमीच्या बेडकांपेक्षा भिन्न असल्याने त्याच्याकडे संशोधकांपासून प्राणीप्रेमींपर्यंत साऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. हा वाळवंटी पावसाळी प्रकारातील (डेझर्ट रेन फ्रॉग) असून तो इतर बेडकांपेक्षा अगदीच अनोखा आहे. विशेष म्हणजे घशातून निघणारा विशिष्ट आवाज हे जसे इतर बहुतेक सर्व बेडूक प्रजातींचे वैशिष्ट्या असते तसे याचे नाही. हा बेडूक अजिबात आवाज करीत नाही. त्याचे डोके आणि डोळेही इतर बेडकांप्रमाणे उठून दिसणारे नसतात. त्याचा रंग वाळूसारखा असतो. त्यामुळे वाळवंटात तो सहजासहजी दिसून येत नाही. हा बेडूक घशातून ध्वनी काढत नसला तरी जेव्हा तो संकटात सापडतो, किंवा दुसरा प्राणी त्याची शिकार करण्यासाठी सरसावतो, तेव्हा तो तोंडातून विचित्र आणि मोठा ध्वनी काढू शकतो. हा ध्वनी इतका भीतीदायक असतो, की बहुतेकवेळा या बेडकाचा शिकाऱ्यांपासून बचाव होतो. तो इतर बेडकांप्रमाणे उड्याही मारत नाही. तो मोठ्या आकाराचा आणि मंदगती हालचाल करणारा आहे, अशी त्याची इतर वैशिष्ट्यो आहेत.