महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देव आहे कसा ?

06:06 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव

Advertisement

देव अशाने पावायचा नाही रे

Advertisement

देव बाजाराचा भाजीपाला नाही रे

कोणी आहे म्हणून मानतात. कोणी नाही म्हणून म्हणतात. पण देव नावाचा कुणीतरी नाही किंवा देवावर माझा विश्वास नाही, देव ही संकल्पनाच मला पटत नाही. असं म्हणणारे लोक म्हणतानाच त्या संकल्पनेचं अस्तित्व मान्य करतात. आयुष्यभर देव देव देव करून राबत राबत मरणारी माणसं असतात. तसं देव नाही, देव नाही, देव नाही असं ओरडूनही आयुष्यभर किनाऱ्याला लागणारी माणसं असतात. गंमत वाटते ऐकून. प्रश्न पडतो की हे सगळं ऐकून देव नावाची जी संकल्पना आहे किंवा देव नावाचा जो मनुष्य आहे, म्हणजेच आकाशातला जो परमेश्वर आहे तो हे सगळं ऐकून काय म्हणत असेल? असा नेहमी प्रश्न पडतो. देवांनीच हे जग निर्माण केलं. आपण सगळे म्हणजेच देवाची निर्मिती आहोत. त्याच्या इच्छेने कारभार चालतो असे आपण म्हणतो. आणि ज्या वेळेला एखादा माणूस मरून जातो त्यावेळेलाही तो देवाघरी गेला असं म्हणत म्हणत लोक डोळे पुसतात. हे देवाचे घर आहे कुठे? आपल्याला सगळ्यांना पडलेला एक प्रश्न आहे. कारण देवाघरी गेलेला माणूस परतून येऊ शकत नाही. त्यामुळे देवाचं घर नक्की आहे कुठे हे आपल्याला कोणाला जिवंतपणे काही कळत नाही. हां तसं म्हणायचं तर आमचे गदिमा

इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे

देवाचे घर बाई उंचावरी

ऐक मजा तर ऐक खरी

असं म्हणतात. अशी छान छान गाणी लिहून प्रत्येकाने आपापल्या परीने देवाचं घर कसं असेल याचा विचार केलेला आहे. ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीप्रमाणे उत्तम कवी, गायक, वादक कलाकार ही सर्व मंडळी आपल्याला खरोखरच परमेश्वरी सानिध्य घडवतात. कारण अतीव आनंदाचा ठेवा एकाएकी अनुभवाला येणे यापेक्षा परमेश्वर म्हणजे वेगळं काय असतं?

एकूण देव काय आहे? देवाचं घर कुठे असतं, देव करतो तरी काय? असे प्रश्न सोडवत अनेक माणसांचं आयुष्य व्यतीत होत असतं. पण देव हे कोडंच आहे.  देव राहतो कुठे या प्रश्नाला अनेक उत्तरं आहेत. त्याच्यापैकी एक सुंदर उत्तर बाबूजी सुधीर फडके यांनी दिलंय. ते म्हणजे,

देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी

देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई

आपण देवळात जातो, नमस्कार करतो, त्या वेळेला हात

 

स्वत:च्या छातीशी आणतो. अर्थात हृदयाशी आणतो. जसा तो समोरच्या मूर्तीला नमस्कार असतो तसाच आपल्या हृदयातल्या देवाला तो पहिला नमस्कार असतो. कारण देव राहतो कुठे या प्रश्नाचे पहिले उत्तर आहे की ‘देव अंतरात नांदे’. आपलं सुद्धा एवढंच असतं आणि देवाचा वास हा आपल्या हृदयात असतो असं जर म्हटलं तर मग देव एवढासा कसा? आणि एखादी व्यक्ती जेव्हा कालवश होते त्या वेळेला तिचा आत्मा पंचतत्त्वात विलीन झाला असं आपण म्हणतो. आणि ही पंचतत्वं ही देवांची तत्त्व आहेत असं म्हटलं जातं. मग तेव्हा देव एवढा मोठा, एवढा व्यापक कसा होऊन जातो? हाही प्रश्न राहतोच. तर त्या प्रश्नाचं उत्तर असं मिळतं की, ‘देव शोधुनिया पाही देव सर्वांभूताठायी’. जर का दाही दिशी देव कोंदलेला असेल. देव जर आभाळात सागरात वायूमध्ये पाण्यामध्ये फुलांमध्ये फळांमध्ये सगळीकडे असेल, तर मग तो शोधायचा तरी कसा? नक्की तो कुठे आहे म्हणायचं? आणि सर्वत्र जर का आहे तर आपल्याला हवं तेव्हा त्यातलं देवाचं तत्व आपल्यापर्यंत कसं पोहोचेल? किंवा आपण त्याच्यापर्यंत कसे पोहोचू?

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा व्यापक असलेला देव मूर्तीमध्ये कसा काय असतो, मूर्तीमध्ये तो मावतो तरी कसा? हा प्रश्न आपल्या प्राचीन संस्कृतीने अतिशय यशस्वीपणे सोडवलाय. मूर्ती ही देवासाठी नसते. मूर्ती ही आपल्यासाठी असते. देव सर्वत्र असतो पण आपल्याला दिसणारा देव पाहिजे आहे. ज्याच्यावर आपलं लक्ष आपल्याला केंद्रित करता येईल, ज्याचं आपल्याला ध्यान करता येईल. मानवी दृष्टीच्या समोर काहीतरी घन आणि मर्यादित असं असलं पाहिजे. मानवी देहाच्या मर्यादा आपल्या प्राचीन संस्कृतीने योग्य आणि बरोबर ओळखल्या म्हणून त्यांनी देवाला मूर्तीत आणलं आणि प्रत्येक देवतेच्या तत्त्वाची जी काही वैशिष्ट्यां असतील, ती त्या त्या मूर्तीमध्ये उभी केली जातात. जेणेकरून देवतेचे तत्त्व समजून घेऊन उपासना करणं सोयीचं पडावं, सोपं जावं.

अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला

बा रे सांडला सांडला भावभक्तीचा सांडला

चंद्रशेखर गाडगीळ यांचे स्वर असलेलं, शरद निफाडकर यांच्या लेखणीतून उतरलेलं हे लोकप्रिय गीत अगदी उदास माणसाच्या चित्तवृत्ती सुद्धा प्रसन्न करून सोडणारं गीत आहे. एकाएकी आसपास धूपाचा, उदबत्तीचा गंध दरवळतोय असं वाटायला लावणारं हे गीत!  याची संगीतरचना विलक्षण सुंदर आहे. ‘अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम’ असं म्हणणारे या गाण्याचे शब्द. भक्तासाठी केला उभा हा संसार

भांडाराचे दार तुझ्या हाती.

कुठेतरी याच्या पाठीमागे असा आपल्याला अर्थ मिळतो की हा संसार उभा करणे, माणसा माणसांनी आपसामध्ये नाती जोडणे हे सगळं, सगळं काही आपल्याला देव कळावा यासाठीच मांडलेलं आहे. एखादा खेळ मांडावा, एखादा डाव मांडावा तसं हे सगळं मांडलेलं आहे. ज्या क्षणी मनुष्याचे काही उपाय चालेनासे होतात, त्या क्षणी ‘भांडाराचे दार तुझ्या हाती’ या ओळीचा खरा अर्थ कळतो. म्हणजे जे काही चाललेलं आहे ते ईश्वरेच्छेने चाललं आहे याची जाणीव करून देण्यासाठी आयुष्यात दु:ख येत असावं. कटकटी येत असाव्यात, त्रास येत असावेत. त्याचप्रमाणे आपल्या धीराची परीक्षा बघण्यासाठी आपल्या हिमतीची तपासणी करण्यासाठी ही सगळी संकटं आपल्याकडेच येतात. एकूण काय

अनंता तुला कोण पाहू शके?

तुला गातसा वेद झाले मुके

अशी त्या देवाची व्याप्ती आहे. त्यातही

फुले सृष्टीची मानसा रंजिती

घरी सोयरी गुंगविती मती

अशा दोन परस्पर विरोधी परिस्थिती आपल्याला आयुष्यभर बघायला मिळत असतात. त्यातूनच आपण मार्ग काढत असतो. शेवटी आपल्याला हे पटतं की

कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी

असा सगळीकडे सारखा सारखा दिसणारा देव! देव अंतरात नांदे...हेच खरं.

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article