दिल्लीत फटाके फुटलेतच कसे?
सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली सरकारसह पोलिसांना विचारणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवाळीच्या काळात दिल्लीत न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि पोलिसांना फटकारले आहे. या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि पोलीस आयुक्तांकडून फटाक्मयांवर बंदी लागू करण्यासाठी काय पावले उचलली आहेत यावर आठवडाभरात उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
दिल्लीतील प्रदूषण आणि फटाक्यांवरील बंदीच्या निर्णयाबाबत गाफील राहिल्याबद्दल न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. न्यायालयाने स्वत:हून कारवाई करत न्यायालयाने फटाक्यांवरील बंदीबाबत कडक पाऊल उचलताना पुढील वषी दिवाळीत फटाक्मयांवर बंदी घालणाऱ्या आदेशांचे उल्लंघन होऊ नये यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे म्हटले आहे. फटाके वाजविण्यावरील बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविऊद्ध पॅम्पस सील करण्यासारख्या कठोर कारवाईची गरज असल्याचे मत न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने मांडले.
पंजाब-हरियाणाकडूनही मागितले उत्तर
खंडपीठाने पंजाब आणि हरियाणा सरकारांना ऑक्टोबरच्या शेवटच्या 10 दिवसांमध्ये शेतात जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल 14 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये दिवाळीच्या काळात शेतात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. दिवाळीच्या एक दिवस आधी 160 शेतांमध्ये आग लागली होती, तर दिवाळीच्या दिवशी ही संख्या 605 वर पोहोचली.