For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्याधा तू महापापी असशीलच कसा?

06:30 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्याधा तू महापापी असशीलच कसा
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

जराव्याधाने श्रीकृष्णांची मनापासून स्तुती केली आणि तो म्हणाला, अतिसज्ञान मंडळींनीही तुमच्या लीलेपुढे हात टेकलेले आहेत. असं असताना माझ्यासारखा असदगतीला पात्र असलेला अधम मनुष्य तुमच्या सर्वथा अतर्क्य असलेल्या लीलेचे वर्णन काय करणार? तेव्हा आता मी थांबतो. उगीच बाष्कळ बडबड करण्यात अर्थ नाही. आता माझ्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तुम्ही मला देहदंड द्या. तुमच्या हातून देहदंड मिळाला की माझ्या सर्व पापांचे निर्दलन होईल. माझा उद्धार होण्यासाठी तेव्हढी कृपा करा. असं म्हणून जराव्याधाने श्रीकृष्णांना लोटांगण घातले आणि धावत जाऊन त्यांचे दोन्ही चरण पकडले. त्याने केलेली स्तुती ऐकून भगवंत प्रसन्न झाले. वेदांचे मंथन करून बोध सांगणाऱ्या, सगळ्या जगाचा आनंदकंद असणाऱ्या, स्वरूपाने स्वानंदशुद्ध असणाऱ्या भगवंतांनी जराव्याधावर संपूर्ण कृपा करायचे  ठरवले. ते म्हणाले, तू बेधडक जीव घेणारा पारधी असूनसुद्धा माझा अपराध केला म्हणून घाबरून गेला आहेस पण प्रत्यक्षात तू माझी कार्यसिद्धी केली आहेस. म्हणून तुला अभय देऊन मी तुझी त्रिशुद्धी करणार आहे. आपण भगवंतांना बाण मारला आणि त्यामुळे त्यांची कार्यसिद्धी झाली हे त्यांच्याच तोंडून ऐकून जराव्याध आश्चर्यचकित झाला. आपल्या बोलण्यामुळे तो बुचकळ्यात पडला आहे हे पाहून त्याचा झालेला गोंधळ दूर करावा ह्या उद्देशाने भगवंत म्हणाले, अरे, सांबाने स्त्राrरूप घेतले आणि ब्राह्मणांशी कपट केले त्यामुळे त्यांना राग आला. त्या रागाच्या भरात त्यांनी सर्व यादव कुळाला शाप दिला. यादवांना फारच मस्ती आल्यामुळे ते सहजी कुणाला आटोपणारे नव्हते. त्यांचा सर्वनाश व्हावा म्हणून सांबाने स्त्राrरूप घ्यावे, सगळ्या यादवांनी मिळून ब्राह्मणांचा अपमान करावा मग त्यांनी कुळाला शाप द्यावा म्हणजे अशी तीन प्रकारची लीला माझीच होती. आणखी पुढे ऐक, त्या शापामुळे जे निर्माण झालेल्या मुसळाच्या लोखंडाच्या कड्याचा तुकडा माशाने गिळावा, नेमका तोच मासा तुझ्या जाळ्यात अडकावा आणि त्या माशाच्या पोटात तुला सापडलेल्या लोखंडाच्या तुकड्याचा तू बाण करावास, त्या बाणाने हरणाची शिकार करण्याच्या लोभाने तू माझ्या तळपायाला बाण मारावास हा सगळा घटनाक्रम मीच रचला होता. अरे, माझी बुद्धी ही अनादि आहे तसेच माझी प्रत्येक क्रिया अतिशय शुद्ध असते आणि त्यातूनच प्रत्येकाने मी रचलेल्या विश्वनाट्यात कोणती भूमिका किती वेळ करावी हे ठरवतो. आणि त्यानुसार प्रत्येकाकडून ती करून घेतो पण मनुष्य अहंकाराने बाधित होऊन मी केले, मी केले म्हणून नाचत असतो. तुझीही देहबुद्धी जागृत असल्याने तुला असे वाटते की, तू मारलेल्या बाणाने माझा वेध घेतला आणि म्हणून तू स्वत:ला अपराधी समजत आहेस. मुळातच तात्पुरते अस्तित्व असलेल्या देहाचा अभिमान बाळगून तुझ्या हातून पाप घडले अशी कबुली देत आहेस आणि त्या पापाचे परिमार्जन होण्यासाठी मी तुला देहदंड द्यावा अशी प्रार्थना करत आहेस. आता तुला तू पाप केले आहेस असे वाटतच असेल तर त्या पापाचे परिमार्जन मी तुला देहदंड देऊन होणार नसून त्यासाठी केवळ तुला होणारे माझे दर्शन पुरेसे आहे. सांगायचे विशेष म्हणजे, माझे नुसते नाम घेतले तर कोटी कोटी महापातके नष्ट होतात पण तुला तर माझे प्रत्यक्ष दर्शन झाले. माझी क्षणार्ध गाठ पडावी म्हणून काही लोक दऱ्याखोऱ्यातून भटकत असतात, काही गुहेत राहून तपश्चर्या करत असतात, काही योगयागाचे अनुष्ठान करत असतात, तर काही हटयोगी बनतात. कित्येक लोक निरनिराळे नेम करून त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी अतिशय कष्ट उपसत असतात. पण त्यांना मी स्वप्नातही भेटत नाही. असे असताना तू मात्र मला प्रत्यक्षात बघितलेस. तुझे भाग्य किती थोर असेल ह्याची तू कल्पना केलेली बरी! मग तू पापी असशीलच कसा?

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.