आता पूर्ण राज्याचा दर्जा मागणार कसा?
पहलगाम हल्ल्यासंबंधात ओमर अब्दुल्लांचे विधान : विधानसभेत हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव संमत
वृत्तसंस्था / श्रीनगर
पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यात बळी गेलेल्यांचे संरक्षण करण्याचे उत्तरदायित्व आम्ही निभावू न शकल्याने आता आम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा मागण्यासाठीही जागा उरली नाही, असे विधान जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. जम्मू काश्मीर विधानसभेत सोमवारी या हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव संमत झाला. तो मांडताना त्यांनी हे प्रतिपादन केले. आम्ही आमच्या ‘अतिथीं’चे रक्षण करु शकलो नाही, अशी खंत त्यांनी या हल्ल्याच्या संदर्भात केलेल्या विधानसभेतील भाषणात व्यक्त केली.
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद येथील स्थानिक लोकांच्या सहकार्यानेच नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे असे कोणतेही पाऊल उचलता कामा नये, की ज्यामुळे स्थानिक लोक प्रशासनापासून दूर जातील. पेहलगाम हल्ल्यामुळे आम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा मागता येणे अशक्य झाले आहे. आम्ही कोणत्या तोंडाने हा दर्जा मागणार, असा प्रश्नही ओमर अब्दुल्ला यांनी विधानभेत विचारला.
उपयोग करणार नाही
पहलगाम हल्ला ही संपूर्ण राज्याचा दर्जा मागण्यासाठी एक संधी आहे, असे आम्ही मानत नाही. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला ही मागणी करता येणार नाही. प्रदेशात आधी शांतता निर्माण होणे आवश्यक आहे. आम्ही या संधीचा उपयोग पूर्ण राज्य मागण्यासाठी न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विशेष अधिवेशन
पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अब्दुल्ला यांच्या पुढाकाराने जम्मू-काश्मीर विभानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेनश सोमवारी आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात त्यांनी या हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध केला नाही. अधिवेशनात अब्दुल्ला यांच्यासह अनेक पक्षांच्या सदस्यांनी हल्ल्याचा निषेध करणारी भाषणे केली. त्यानंतर प्रस्ताव एकमुखाने संमत करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
प्रदेशभर शोक, संताप
पेहलगाम हल्ला झाल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये स्थानिकांनी मोर्चे काढून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच अनेक मशिदींमधून शोक संदेश देण्यात आला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून या हल्ल्याचा निषेध केला आहे. यावरुन या प्रदेशातील स्थानिकांना काय हवे आहे, याचे संकेत मिळतात. या लोकांना शांतता हवी आहे. त्यांना रोजगार हवा आहे. दहशतवादाकडे आकृष्ट झाल्यास जीवनात अस्थिरता येईल, याची जाणीव त्यांना झाली आहे. याचा विचार केला जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
साऱ्या देशावर परिणाम
पहलगाम हल्ल्याचा परिणाम साऱ्या देशावर झाला आहे. कधी नव्हे ती जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. पर्यटनाचा व्यवसाय बहरला होता. तथापि, दहशतवाद्यांना हे पाहवले नाही आणि त्यांनी हल्ला करुन निरपराध पर्यटकांचे प्राण घेतले. त्यामुळे केवळ या प्रदेशालाच नव्हे, तर सर्व देशाला धक्का बसला आहे. तरीही आता पुन्हा या प्रदेशात पर्यटकांचे आगमन होत आहे. हे सुचिन्ह असल्याचे मत ओमर अब्दुल्ला यांनी भाषणात व्यक्त केले
खोऱ्यात अभियान जोरात
दहशतवादी निपटून काढण्यासाठी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी अभियान हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत 750 हून अधिक संशयित दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 20 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.