बंडखोरी करणारा मुख्यमंत्री कसा होऊ शकेल!
राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोतांकडून पायलट लक्ष्य : विरोधी गटात नाहीत 10 आमदार
वृत्तसंस्था / जयपूर
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानात पोहोचण्यापूर्वी काँग्रेसमधील चढाओढ पुन्हा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा शाब्दिक हल्ला केला आहे. ज्या व्यक्तीकडे 10 आमदार नाहीत, ज्याने बंडखोरी केलेली आहे, ज्याला ‘गद्दार’ (विश्वासघात करणारा) नाव देण्यात आले आहे, अशा व्यक्तीला लोक मुख्यमंत्री कसे स्वीकारू शकतात असे विधान गेहलोत यांनी केले आहे. गेहलोतांच्या या विधानानंतर पायटल यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
गेहलोतांनी मला पूर्वी ‘नाकारा’ (नाकारण्यात आलेला), ‘निकम्मा’ (बिनकामाचा) आणि गद्दार संबोधले आहे. गेहलोतांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ही वेळ भाजपशी लढण्याची असल्याने असे खोटे आरोप करण्याची गरज नाही. गेहलोत हे पक्षाचे अनुभवी नेते असल्याने त्यांनी इतके असुरक्षित होऊ नये. आम्ही आज एखाद्या पदावर असलो तरी नेहमी त्याच पदावर राहू असे घडत नाही असे म्हणत पायलट यांनी गेहलोतांना प्रत्युत्तर दिले आहे.
तर काँग्रेसने गेहलोत यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेतले आहे. गेहलोत अन् पायलट यांच्यातील वाद सोडवत काँग्रेस पक्ष मजबूत केला जावा. सध्या भारत जोडो यात्रा यशस्वी करणे हेच सर्वांचे लक्ष्य असल्याचे पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
पायलट यांच्या बंडखोरीमुळे आम्ही 34 दिवस हॉटेलमध्ये थांबून राहिलो. पायलट काँग्रेसचे सरकार पाडवू पाहत असताना अमित शाह देखील त्यांच्या मदतीला होते. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही पायलट गटाला पाठिंबा होता असा दावा गेहलोत यांनी एका मुलाखतीत केला आहे. पायलट यांच्या बंडखोरीमुळे आमचे आमदार अन् मलाही त्रास झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्ही कसे स्वीकारू असे विधान गेहलोत यांनी केले आहे.
आज तरी मीच मुख्यमंत्री
मुख्यमंत्रिपदी आता तरी मीच आहे. पक्षश्रेष्ठींनी मला मुख्यमंत्रिपद सोडून द्या असा निर्देश किंवा खुर्ची सोडण्याचा कुठलाच संकेतही दिलेला नाही. मी पक्षश्रेष्ठींसोबत आहे. पायलट यांचे नेतृत्व कुणीच मान्य करणार नाही. पक्षशेष्ठी राजस्थानसोबत न्याय करतील. काँग्रेस नेते अजय माकन अन् पक्षनेतृत्वाला आमची भूमिका सांगितली आहे. राजस्थानात मी तीनेवळा मुख्यमंत्री राहिलो आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद महत्त्वाचे नाही. जर मी मुख्यमंत्री राहिल्यास काँग्रेस सत्तेवर येणार असल्यास मलाच पदावर ठेवा. अन्यथा दुसऱया नेत्याला मुख्यमंत्री करा, असे गेहलोत म्हणाले.
मंत्रिपदासाठी पायलट यांचा फोन
2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत राजस्थानातून काँग्रेसचे 20 खासदार निवडून आल्यावर पक्षनेतृत्वाने मला दिल्लीत बोलाविले होते. सचिन पायलट यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची शिफारस मी केली होती. पायलट यांनी त्यानंतर फोन करत स्वतःच्या नावाची शिफारस करण्याची विनंती केली होती. मी त्यापूर्वीच त्यांचे नाव मंत्रिपदासाठी सुचविले होते. मनात आत्मियता असल्यानेच मी त्यांच्यासाठी हे केले होते असा दावा गेहलोत यांनी केला आहे.
पायलट यांच्यामुळेच वातावरण बिघडले
पक्षाच्या स्थितीबद्दल मला चिंता नाही. किरकोळ मतभेद सर्वच ठिकाणी असतात. 25 सप्टेंबर रोजी बंडखोरी झाली नव्हती. 2019 मध्ये बंडखोरी झाली होती. 34 दिवस आमदार हॉटेल्समध्ये राहिले होते. तर चालू वर्षी 25 सप्टेंबरला 90 आमदार एकत्र आले होते. याच आमदारांनी सरकार वाचविण्यात सहकार्य केले होते. पक्षश्रेष्ठींच्या पाठिंब्याशिवाय कुठल्याही मुख्यमंत्र्याला आमदारांचे समर्थन मिळू शकत नाही. तर पक्षासोबत विश्वासघात केलेल्या नेत्याला आमचे आमदार कसे स्वीकारणार असे म्हणत गेहलोत यांनी पायलट यांना लक्ष्य केले आहे.