झाड कोसळून श्रीनगर येथे घरांचे नुकसान
बेळगाव : चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील झाडे कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री श्रीनगर येथील चन्नम्मा हौसिंग सोसायटी येथे कोसळलेल्या वृक्षामुळे घराचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर वीजवाहिन्यांचेही नुकसान झाल्याने काहीकाळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. धोकादायक वृक्ष असल्यामुळे 2021 पासून परिसरातील नागरिकांनी तो काढण्याची मागणी महापालिका तसेच इतर विभागांकडे केली होती. तरीदेखील तो वृक्ष हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गुरुवारी रात्री झालेल्या वारा-पावसामुळे निलगिरी वृक्ष घरावर कोसळला. झाडाची व्याप्ती मोठी असल्यामुळे परिसरातील घरांचे नुकसान झाले. वीजवाहिन्याही तुटून पडल्या. झाडांमुळे घराचे पाईपलाईन, सोलार व्यवस्था, कंपाऊंड तसेच प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.