Sangli : बुधगावमध्ये एसटी महिला वाहकाचे घर फोडले
बुधगावमध्ये दागिन्यांची चोरी; ग्रामस्थांची पोलीसांकडे मागणी
बुधगाव : केरळला सहलीसाठी गेलेल्या बुधगाव ता. मिरज येथील आदर्श शाळेजवळील नम्रता कॉलनीजवळ राहणाऱ्या वर्षा हरिदास पाटील या एसटी महिला वाहकाचे घर चोरट्यांनी फोडले. मंगळवारी रात्री चोरट्यांनी कुलुप तोडून घरातील तीन लाखाचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. पाटील यांचे नातेवाईक रामदास पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.
वर्षा पाटील या रविवारी कुटुंबासह केरळला सहलीसाठी गेल्या आहेत. घराला व गेटला कुलुप लावण्यात आले होते. तथापि बुधवारी सकाळी त्यांच्या घराचे कुलुप कोणीतरी काढल्याचे शेजारील लोकांना दिसून आले.
शेजारील लोकांनी वर्षा पाटील यांच्या नातेवाईकांना याची कल्पना दिली. पाटील यांचे नातेवाईक रामदास पाटील यांनी तात्काळ वर्षा पाटील यांच्या घराकडे धाव घेतली असता घराचे कुलूप तोडल्याचे व घरात शिरून चोरट्यांनी कपाटातील कपडे विस्कटून व आतील लॉकर फोडून चोरी केल्याचे दिसून आले.
चोरट्यांनी तिजोरी फोडून त्यातील दीड तोळ्याचे कानातील दागिने, एक तोळयाचा हार आणि अर्धा तोळयाचा टिका असे एकूण तीन लाखाचे सोन्याचे दागिने काही चांदी लंपास केल्याचे दिसून आले. बुधगावमध्ये गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. भरदिवसा किरकोळ चोऱ्या होत असून भुरट्या चोरट्यांमध्येही वाढ होत आहे. सांगली ग्रामीण पोलीसांनी रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.