अपत्यांच्या त्रासामुळे बागेत घर !
आपल्याला मुले असावीत, असे प्रत्येक दांपत्याला वाटते, ही वस्तुस्थिती आहे. मुले असणे ही आनंदाची आणि समाधानाची बाब असते. तथापि, अनेक मुले खोडकर असतात. आईवडिलांना त्रास देण्यात त्यांना आनंद वाटतो. काहीवेळा हा त्रास इतका वाढतो, की मातापिता अगदी मेटाकुटीला येतात. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणारे 38 वर्षीय स्टुअर्ट हॅमिल्टन आणि त्यांची पत्नी 33 वर्षीय पत्नी क्लोई यांना सध्या असाच अनुभव येत आहे. या दांपत्याला दोन वर्षांचा एक पुत्र आहे आणि नुकतीच एक कन्याही क्लोई यांच्यापोटी जन्माला आली आहे. स्टुअर्ट हॅमिल्टन हे एका माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांना दिवसातून बरेच तास काम करावे लागते. हे काम करुन ते घरात येतात तेव्हा त्यांना त्यांच्या अपत्यांच्या खोडकरपणाला तोंड द्यावे लागते. ही मुले त्यांना अतिशय त्रास देतात, असे त्यांचे म्हणणे आहे. पण ही मुले इतकी लहान आहेत, की त्यांना अन्य कोणत्या मार्गाने गप्प करण्याचीही सोय नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. आता या समस्येवर त्यांनी असा उपाय शोधला आहे, की ज्याची बरीच चर्चा होत आहे.
स्टुअर्ड हॅमिल्टन यांनी मुलांच्या या त्रासापासून निदान काही काळ तरी सुटका मिळावी म्हणून चक्क आपल्या बागेत आणखी एक छोटे खोलीवजा घर बांधले आहे. शाळेत विद्यादानाचे काम आटोपून ते परत येतात, तेव्हा आपल्या घरात जात नाहीत. ते या बागेतील घरात काहीकाळ विश्रांती घेतात. कित्येकदा याच घरात ते रात्रीची झोपही घेतात. हे घर एखाद्या तंबूप्रमाणे आहे. शेजारीपाजारी जेव्हा त्यांना या तंबूत झोपताना पाहतात, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. मुलांचा त्रास तो असा किती असणार ? त्यासाठी असे घराबाहेर तंबू ठोकून झोपण्याची आवश्यकता काय ? असे प्रश्न त्यांच्या मनात येतात.
मात्र, हॅमिल्टन यांना हा उपाय योग्य वाटतो. नवजात मुलांना वाढविण्याचे आणि त्यांचे पालन पोषण करण्याचे मातापित्यांचे कर्तव्यच आहे, हे ते मान्य करतात. आपणही एक पिता या नात्याने हे कर्तव्य करतच असतो. मात्र, आपल्यालाही काहीकाळ मन:शांतीची आवश्यकता आहे. ती घरात मिळत नसल्याने आपण हा उपाय शोधला आहे. या उपायाने आपण ताजेतवाने राहतो आणि अपत्यांचे भरणपोषण अधिक योग्यप्रकारे करु शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे. आपल्या भारतीय मानसिकतेला मात्र, त्यांचा हा उपाय पटणार नाही. कारण, अपत्यांनी दिलेला त्रास हा त्रास मानायचाच नसतो, अशी आपली मानसिकता आहे.