For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोरीतील पार्वती परवार जगते हलाखीचे जीवन

01:09 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
बोरीतील पार्वती परवार जगते हलाखीचे जीवन
Advertisement

भर पावसात घर कोसळले : निराधार योजनेच्या दोन हजारांत करते गुजराण, गरजा भागवताना होतेय ओढाताण : दात्यांकडून मदतीची गरज

Advertisement

शिरोडा : भर पावसात घर कोसळलेले...घरात कमावत असा आधारही कुणीच नाही...असे हलाखीचे व एकाकी आयुष्य जगण्याची कठीण परिस्थितीपार्वती महादेव परवार या वृद्ध महिलेवर ओढवली आहे. परवारवाडा, बोरी येथील या निराधार महिलेची गुजराण सरकारच्या निराधार योजनेतून महिन्याकाठी मिळणाऱ्या दोन हजार ऊपयांवर चालते. हे पैसेही वेळोवेळी बँक खात्यात जमा न झाल्यास दोनवेळचे जेवण व इतर गरजा भागवताना तिची ओढाताण होत आहे.

बोरी पंचायत कार्यालयाजवळ पार्वती हिचे दोन खोल्यांचे जुने घर आहे. मागील आठवड्यात भर पावसात तिचे हे घर कोसळल्याने सध्या चुलत जाऊकडे तात्पुरता आसरा घेण्याची वेळ तिच्यावर आली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला असून पदरी असलेल्या एकुलती एक मुलीचेही काही वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे आयुष्यात आलेले एकाकीपण व सोबतीला अत्यंत गरिबी असे हलाखीचे जीवन ती जगत आहे.

Advertisement

पतीच्या निधनानंतर बांबू कारागिरीचा पारंपरिक व्यवसाय करून तिने आपला उदरनिवार्ह कसाबसा चालविला. रोजंदारीवर छोटीमोठी कामेही केली. पण तिच्या दुर्दैवाचे दशावतार एवढ्यावरच संपले नाहीत. दहा वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी वास्को येथील माहेराहून घरी परतत असताना वाटेत बसची धडक बसून अपघात झाला.

सेवाभावी संस्था दानशूर व्यक्तींनी मदत करावी!

या अपघातात तिच्या उजव्या हाताला जबर दुखापत झाली व या हाताने तिला काम करणे जमत नाही. त्यामुळे सरकारच्या निराधार योजनेतून महिन्याकाठी जे दोन हजार ऊपये मिळतात, त्यावरच तिची कशीबशी गुजराण चालते. डोक्यावर जुन्या घराचे जे छत्र होते, त्याची दुऊस्ती करण्यास पैसे नसल्याने सहा महिन्यांपासून त्याची पडझड चालली होती. यंदाच्या पावसात ते कोसळून पडल्याने उदरनिर्वाहाच्या जोडीलाच निवाऱ्याचा प्रश्नही तिच्यापुढे उभा ठाकला आहे. सध्या तिने आपल्या चुलत जाऊकडे तात्पुरता आश्रय घेतला आहे. जगण्याचे सारेच मार्ग बंद झालेल्या पार्वतीला वृद्धापकाळात मदतीची तातडीने गरज आहे. घर कोसळल्याने पंचायतीकडून तिला पाच हजार ऊपयांचा धनादेश मिळाला होता. फोंडा येथे जाताना प्रवासात तोही कुठे हरवल्याने तिची चिंता वाढली आहे. एकाकी व निराधार असलेली ही वृद्ध महिला मदतीच्या प्रतीक्षेत असून एखादी सेवाभावी संस्था, सरकार किंवा समाजातील दात्यांकडून तिला आधार मिळाल्यास या दु:खातून बाहेर पडण्यास तिला मदत होणार आहे.

श्रमधामातून घर उभारण्याची मागणी

काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांनी सध्या विविध तालुक्यांमध्ये गरीब व गरजू कुटुंबासाठी श्रमधाम योजनेतून घरे उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. पार्वती परवार हिचे घर भर पावसात कोसळल्याने सध्या निवाऱ्याची तिला अत्यंत गरज आहे. श्रमधामातून तिचे दोन खोल्यांचे पडके घर उभारले गेल्यास तिला मोठा आधार मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.