सुळगा-हिंडलगा येथे शॉर्टसर्किटने घराला आग
संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी
बेळगाव : शॉर्टसर्किटमुळे सुळगा-हिंडलगा येथील एका घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. एचईआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, यामध्ये संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुळगा-हिंडलगा येथील मनोहर पाटील यांच्या मालकीच्या घरात संजय बबन जाधव हे भाडोत्री राहतात. कुटुंबीय घराला कुलूप घालून बाहेर गेले असता सकाळी 10 च्या दरम्यान घरातून धुराचे लोळ बाहेर पडू लागले.
आग लागल्याचे शेजाऱ्यांना समजताच त्यांनी ही माहिती एचईआरएफ रेस्क्यू टीमला दिली. त्यानंतर प्रमुख बसवराज हिरेमठ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विद्युत मोटरच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच धाडस करत घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही वेळानंतर अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी देखील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. घरातील फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आगीची दुर्घटना घडल्याचे दिसून आले. यामध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.