Satara Crime : उंब्रज येथे हाॅटेल मॅनेजरला शस्त्राचा धाक दाखवून 70 हजाराला लुटले
उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तिघांना अटक
उंब्रज : उंब्रज येथील हॉटेल वंदन बिअर बार अँड लॉजिंगमध्ये गुरुवारी रात्री ८.३० वाजता दरोडा झाला. हॉटेल मॅनेजर रोहित भोसले यांनी दारू पिल्याचे बिल विचारले असता संशयितांनी मारहाण करून हॉटेलमधील गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन सीसीटीव्हीच्या वायऱ्या तोडल्या व डिव्हिआर काढून नेले. संशयितांनी रिवाल्हर सारखी वस्तू दाखवून हॉटेलमधील दारूच्या बाटल्या, टेबल, खुर्च्यांची तोडफोड केली आणि रोहित भोसले यांच्यावर हाताने व लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.
मारहाणीत हाँटेलचा मॅनेजर जखमी झाला असून या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात शुक्रवारी ७ रोजी दुपारी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहित सयाजी भोसले वय २३ हॉटेल मॅनेजर रा. भोसलेवाडी ता. कराड यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रथमेश पाटील, अजय यादव, विराज देसाई ( पूर्ण नाव माहीत नाही), दत्ता कोळेकर व इतर दोन ते तीन अनोळखी संशयितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी रोहीत भोसले हा हॉटेल वंदन बिअर बार अँड लॉजिंग येथे मॅनेजर म्हणून काम करतो. दि. ६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर फिर्यादीने दारु पिल्याचे बिल देण्याबाबत विचारले असता संशियीत आरोपी यांनी मारहाण करून हॉटेल मधील गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या वायऱ्या तोडून डिव्हिआर काढून घेऊन रिवाल्हर सारखी वस्तू फिर्यादीला दाखवून हॉटेलमधील दारूच्या बाटल्या, टेबल, खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान करून खुर्च्या फेकून मारून हाताने व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीस मारहाण केली व पैसे तसेच सीसीटीव्हीचा डिव्हीआर घेऊन पळून गेले.
मारहाणीत मॅनेजर रोहीत भोसले हा जखमी झाला आहे. पोलीसांनी संशयित प्रथमेश पाटील, अजय यादव, विराज देसाई यांना अटक केली असून पुढील तपास सपोनि रवींद्र भोरे करत आहेत.