समुद्रातील ‘हॉट स्पॉट’ : लक्षद्वीप
लक्षद्वीपकडे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून पाहिले जाते. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लक्षद्वीपचे पर्यटन ‘हॉट स्पॉट’ असे संबोधले आहे. तथापि, लक्षद्वीपच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ इच्छिणारे लोक बहुसंख्य आहेत. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा करत पर्यटकांना आवाहन केले. त्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी मोदींसह भारताबाबत केलेली वादग्रस्त टिप्पणी, मंत्र्यांवर झालेली निलंबनाची कारवाई, भारत-मालदीव यांच्यात वाढलेला द्विपक्षीय तणाव या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लक्षद्वीपची चर्चा अधिकच वाढली. येथील पर्यटन सर्वांनाच भुरळ घालते. तसेच या बेटाशी संबंधित मनोरंजक इतिहासही आहे. नरेंद्र मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर लक्षद्वीपबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची सर्वांची उत्सुकता वाढलीय. त्या पार्श्वभूमीवर लक्षद्वीप बेटसमूहाचा घेतलेला हा आढावा...
तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूने उंच पर्वतरांगा अशी भारताची ओळख असली तरी समुद्रात वसलेल्या काही बेटसमूहांचा प्रदेशही भारताच्या अखत्यारित येतो. त्यातीलच एक मुख्य ठिकाण म्हणजे लक्षद्वीप. भारतात 28 राज्यांसह 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाख यांचे विभाजन करून नऊ केंद्रशासित प्रदेश झाले होते. मात्र, दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली या विलिनीकरणामुळे पुन्हा ती संख्या आठ झाली आहे. हे केंद्रशासित प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी मुख्यमंत्री किंवा लेफ्टनंट गव्हर्नर अशा प्रशासकाची नेमणूक करतात. दिल्ली, पुद्दुचेरी व जम्मू आणि काश्मीर इतर पाचपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यांना आंशिक राज्याचा दर्जा देण्यात आला.
लक्षद्वीप हा भारतातील आठ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित
प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त 32 चौ. कि. मी. आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. न्यायालयीन यंत्रणा केरळ उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात आहे. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनीपाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षद्वीपची साक्षरता 92.28 टक्के आहे. ही साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर भारतात दुसऱ्या
क्रमांकावर आहे. पास्फेट, पॅल्शियम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत. बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची आहेत. ही बेटे विस्ताराने लहान असून त्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची तुलनेने बरीच कमी आहे.
लक्षद्वीप हे केरळमधील कोचीपासून 440 किलोमीटर अंतरावर आहे. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. स्वातंत्र्याच्या नऊ वर्षानंतर म्हणजे 1956 मध्ये तो केंद्रशासित प्रदेश बनला. त्यानंतर 26 वर्षांनंतर म्हणजे 1973 मध्ये त्याचे नाव लक्षद्वीप झाले. 1 नोव्हेंबर 1973 रोजी नवीन नाव स्वीकारण्यापूर्वी हा प्रदेश लॅपॅडिव्ह-मिनिकॉय-अमिनीडिव्ही म्हणून ओळखला जात होता. हा 36 बेटांचा एक द्वीपसमूह आहे. लक्षद्वीपची सध्याची एकूण लोकसंख्या सुमारे 70 ते 75 हजार इतकी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची लोकसंख्या 64,473 इतकी असलेली दिसते. तर लिंग गुणोत्तर दर 1000 पुऊषांमागे 946 स्त्रिया आणि साक्षरतेचे प्रमाण 92.28 टक्के आहे. मल्याळी ही येथील प्राथमिक तसेच मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे.
लक्षद्वीपमधील बेटांना वर्षभर पर्यटक भेट देत असतात. येथे सागरी माशांच्या 600 हून अधिक प्रजाती आढळतात. तसेच प्रवाळांच्या 78, समुद्री शैवाळच्या 82, खेकड्याच्या 52, लॉबस्टरच्या 2, गॅस्ट्रोपॉड्सच्या 48, पक्ष्यांच्या 101 प्रजाती असल्याने मत्स्यजीव व पक्षीसंपन्न प्रदेश अशीच त्याची ओळख बनलेली आहे. हे भारतातील चार प्रवाळ क्षेत्रांपैकी एक आहे. या ठिकाणचे प्रवाळ पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. स्कुबा डायव्हिंग, विंड सर्फिंग, स्नॉर्कलिंग, सर्फिंग, कयाकिंग, पॅनोईंग, वॉटर स्कीइंग, स्पोर्ट फिशिंग, सेलिंग आणि नाईट सेलिंग यासारख्या
जलक्रीडा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत. केरळमधील कोचीहून लक्षद्वीपला पोहोचण्यासाठी हवाई सेवा उपलब्ध आहे. तसेच कोचीहून जहाजाने 14 ते 18 तासांत लक्षद्वीप गाठता येते.
उपजीविकेचे साधन : लक्षद्वीपच्या उपजीविकेचे मुख्य साधन सागरी संपदेशी संबंधित आहे. येथील लोक मासेमारी, प्रवाळ गोळा करणे आणि समुद्रातील
प्राण्यांच्या वस्तू गोळा करण्याचे काम करतात. सागरी व्यापार हा येथील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्राsत आहे. लक्षद्वीपमधील लोक सागरी उत्पादनांचा व्यापार करतात. येथील लोकांच्या जीवनमानात पर्यटनाचाही मोठा वाटा आहे. तसेच नारळ बागायतीतून मिळणारे उत्पन्न हा येथील मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. येथील लोक नारळाच्या झावळांपासून हस्तकलेद्वारे वस्तू बनवून विकतात. खोबरेल तेल आणि नारळापासून तयार केल्या जाणाऱ्या इतर वस्तूही धनलाभ देतात. नारळाव्यतिरिक्त लिंबू, चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत.
मुख्य सण : लक्षद्वीपचा मुख्य सण ‘ईद-उल-फित्र’ आहे. हा इस्लामी सण आहे. लक्षद्वीपमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच येथे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण रमजानच्या शेवटी येतो. यावेळी मुस्लीम समाजातील लोक एकत्र नमाज अदा करतात. लक्षद्वीपमध्ये ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख आदी धर्माचे लोकही वास्तव्यास आहेत. येथे राहणारे इतर धर्माचे लोकही आपापले सण साजरे करतात. परंतु त्यांची संख्या कमी असल्याने ‘ईद-उल-फित्र’च्या वेळी जसा उत्साह असतो तसा अन्य सणांवेळी दिसत नाही.
बोलीभाषा : लक्षद्वीपमध्ये मल्याळी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. ही केरळचीही भाषा आहे. या बेटसमूहावरील लोक ‘महाल’ नावाची भाषादेखील बोलतात. ही भाषा मल्याळी भाषेशी मिळती-जुळती आहे. येथील काही लोक धिवेही भाषा देखील बोलतात. मात्र, या भाषेचा वापर लक्षद्वीपमधील काही गावांपुरता मर्यादित आहे. लक्षद्वीपमध्ये सरकारी कामात मल्याळी भाषेचा वापर केला जात असल्यामुळे हीच येथील अधिकृत भाषा आहे. इंग्रजी आणि जेसेरी भाषाही बोलली जाते.
हवामान : लक्षद्वीपच्या हवामानाबद्दल म्हणाल तर येथे सामान्यत: आर्द्रता असते. या बेटावर प्रामुख्याने उन्हाळा आणि पाऊस असे दोन ऋतू येतात. उन्हाळा सामान्यत: मार्चच्या अखेरीस सुरू होतो आणि मेपर्यंत टिकतो. अर्थातच मार्च,
एप्रिल व मे महिन्यात कडक उन्हाळा जाणवतो. येथे पावसाळा जून ते सप्टेंबर दरम्यान येतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 160 सें. मी. आहे. लक्षद्वीपला मान्सूनचा जास्त फटका बसतो आणि भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यात येथील वातावरण प्रसन्न असते. समुद्रातून थंड वारे वाहत असल्यामुळे येथील वातावरण शुद्ध आहे.
वनस्पती-प्राणीसृष्टी : इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 नुसार, लक्षद्वीपमधील वनक्षेत्र 27.10 चौरस किमी आहे. जे त्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 90.33 टक्के आहे. सुमारे 82 टक्के भूभाग खासगी मालकीच्या नारळाच्या बागांनी व्यापलेला आहे. लक्षद्वीपचे पिट्टी बेट भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 अंतर्गत पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे.
ऐतिहासिक ओळख
‘लक्षद्वीप’ हा शब्द संस्कृत शब्दांपासून बनला आहे. हे ‘लक्ष’ आणि ‘द्वीप’ या दोन संस्कृत शब्दांपासून बनलेले आहे. ‘द्वीप’ म्हणजे ‘बेट किंवा जमीन’.
अशाप्रकारे लक्षद्वीप या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ ‘लाखो बेटे’ असा होतो. या बेटसमूहावर अनेक छोटी-मोठी बेटे असल्यामुळेच या नावाने ते ओळखले जाते. हिंदू धर्माच्या प्राचीन धर्मग्रंथांमध्येही या बेटाच्या नावाचा उल्लेख आहे. लक्षद्वीपच्या इतिहासात पोर्तुगीज, ब्रिटिश आणि भारताच्या राजवटीचा उल्लेख आहे.
पोर्तुगीज राजवट (16 वे शतक) : 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी लक्षद्वीप बेट काबीज केले. त्यांनी या बेटसमूहाचा उपयोग व्यापारी केंद्र म्हणून केला.
ब्रिटिश राजवट (17 वे शतक) : 17 व्या शतकात ब्रिटिश साम्राज्याने लक्षद्वीपचा ताबा घेत व्यवसाय आणि प्रशासकीय कारणांसाठी त्याचा वापर केला.
भारतीय शासन (20 वे शतक) : 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने बेटावर दावा केला. तथापि, 1956 मध्ये त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
लोकप्रिय पर्यटनस्थळे...
आगती : लक्षद्वीपचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आगती बेटावर पर्यटक पांढऱ्या वालुकामय किनाऱ्यावर फिरू शकतात. तसेच समुद्राच्या निळ्याभोर पाण्यात पोहू शकतात. डॉल्फिनसारखी सागरी जीवसृष्टी जवळून न्याहाळण्यासाठी बोटीतून प्रवासाची सुविध उपलब्ध आहे.
मिनिकॉय : हे लक्षद्वीपचे दुसरे सर्वात मोठे बेट असून ते एक लक्झरी डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. आलिशान रिसॉर्टस् आणि मूळ कोरल रिफसाठी ते प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि बोट राईडचा आनंद घेऊ शकतात.
बंगाराम : लक्षद्वीपचे आणखी एक आकर्षक बेट, बंगाराम हे स्वच्छ पाणी, पांढरी वाळू आणि समृद्ध सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. येथे डॉल्फिनसोबतच समुद्री कासव मोठ्या प्रमाणात नजरेस पडतात. तसेच जंगल परिसरात हायकिंग (रपेट) करता येते.
कवरत्ती : लक्षद्वीपची राजधानी कवरत्ती हे एक व्यस्त बेट असून सुंदर सरोवर, ऐतिहासिक दीपगृह आणि चैतन्यशील बाजारपेठांसाठी ओळखले जाते. येथे नौकाविहारासोबतच दीपगृहातून सूर्यास्त पाहतो येतो. तसेच स्थानिक बाजारपेठेतील वस्तू खरेदीचा आनंद लुटता येतो.
लक्षद्वीपला भेट देण्यासाठी तुम्हाला परवाना आवश्यक आहे. त्याच्या मंजुरीसठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. भारताच्या मुख्य भूमीवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी पूर्वी असलेल्या कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला नव्हता. तथापि आता निर्बंध सौम्य केल्यामुळे लक्षद्वीपला जाणाऱ्या स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास चालना मिळाली आहे. पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळेच आता दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. येथील काही बेटांवर मनुष्यवस्ती नसली, तरी तेथे वेगवेगळ्या सुविधा पुरवून पर्यटन केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात आला आहे. लक्षद्वीपमधील पर्यटन उद्योग झपाट्याने वाढत असून गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीपला भेट देण्याकडे पर्यटकांचा कलही वाढलेला दिसून येत आहे.
- जयनारायण गवस